नळदुर्ग, दि.१०

 शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत होत असलेल्या विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रम वेळी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दूर ठेवल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या उपजिल्हा प्रमुखांनी या विकास कामाच्या भूमिपूजनाचा निषेध करत सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

सोशल मिडियावर अशी आहे पोष्ट

नळदुर्ग नगरपरिषद हद्दीतील विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम संदर्भात भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी कार्यक्रम महायुतीचा धर्म न पाळता मनमानी कारभार 
याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत,,,,,,,
शिवसेना उपजिल्हाप्रमुख 
श्री ज्ञानेश्वर घोडके 
🏹🏹🏹🙏🏹🏹🏹

 तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरासाठी भरघोस निधी दिला. त्यातून शहरात मागील सव्वा वर्षापासून अनेक रस्त्याची, ओपन स्पेस  विकसित करण्याचे व सभागृहाची कामे सुरू आहेत. वर्षभरापूर्वीही भाजप पदाधिकाऱ्यातील अंतर्गत कलहामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विकास कामाच्या उद्घाटनाकडे पाठ फिरवली होती. हे प्रकरण लोकसभेपूर्वी शमविण्यात त्यांना काही प्रमाणात  यश आले होते. मात्र मंगळवार दि. १०  रोजी सायंकाळी आमदार  राणाजगजितसिंह  पाटील यांच्या हस्ते भीमनगर येथील दलित वस्ती सुधार योजनेतून होणारे 93 लाखाचे सभागृह, इंदिरानगर येथील सिमेंट काँक्रीट रस्ता  (29 लाख 74 हजार 871)  तसेच इंदिरानगर येथील मारुती मंदिरा शेजारील सभागृह ज्याची अंदाजपत्रकीय रक्कम आहे 29 लाख 95 हजार 348 रुपये. या तिन्ही कामाचे भूमिपूजन आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांच्या हस्ते सायंकाळी करण्यात आले. तसेच काही गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती ही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. 

हे घडत असतानाच भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नसल्याची शक्यता असून शिवसेना कार्यकर्त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा काय उद्देश असू शकेल? याबद्दल शहरात उलट सुलट चर्चा आहे.


 दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या  तोंडावर यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसत असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी ही गोष्ट अडचणीची ठरू शकते का नाही याबाबत शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
 
Top