अखेर नंदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अपाञतेची कारवाई

नळदुर्ग , दि. ०८

  तुळजापूर तालुक्यातील नंदगाव  ग्रामपंचायतचा 14 हजार रुपयांचा धनादेश स्वतःच्या नावाने उचलणे येथील प्रभारी सरपंचाला महागात पडले. याप्रकरणी येथीलच सचिन कोरे व मल्लिनाथ बिरुगडे यांच्या तक्रारीवरून धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रभारी सरपंच चैतन्य महादेव पाटील यांचे सदस्यत्व अपात्र ठरवले आहे. याबाबत सर्वप्रथम "तुळजापूर लाईव्ह" न्युज पोर्टलने मे २०२४ मध्ये सविस्तर वृत्त प्रसिध्द करुन आवाज उठविला होता. अखेर तीन महिन्यानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली.


याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, नदंगाव येथील जनतेतून निवडून आलेल्या सरपंच राधिका घंटे यांना अपत्य प्रकरणात अगोदरच अपात्र ठरविले होते. त्यानंतर विद्यमान उपसरपंच चैतन्य पाटील यांच्याकडे ग्रामपंचायतचा प्रभारी म्हणून चार्ज आला, त्यांनी कारभार हाती घेतल्यानंतर दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रामपंचायतचा 14 हजार रुपयांचा धनादेश स्वतःच्या नावे काढून वटविला होता. याप्रकरणी  जिल्हाधिकारी यांच्याकडे सचिन कोरे व मल्लिनाथ बिरुगडे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 अनवये चैतन्य पाटील यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले.

 तक्रारदारांच्या वतीने जेष्ठ वकील दत्तात्रय घोडके यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे नदंगावचे सरपंच या अगोदरच अपात्र ठरले असल्याने, आता उपसरपंचही अपात्र ठरल्याने गावच्या विकासाला खीळ बसली आहे, तसेच  गावचे राजकारण गढूळ झाले आहे,हे सर्व राजकारण थांबवून गावचा विकास कधी होणार असा प्रश्न जनतेतुन  विचारला जात आहे.
 
Top