तुळजापूर विधानसभेसाठी पुन्हा पारंपारिक प्रतिस्पर्धी ? राणादादा पाटील विरूद्ध ठाकरे गटाचे निंबाळकर ?

बाळासाहेबांच्या स्वप्नापोटी आघाडीतून ठाकरे गटाला जागा सुटणार?

तुळजापूर,दि.०९: शिवाजी नाईक 

उशिरा का होईना शिवसेना उबाठा गटाने  तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी शिवसैनिकांचा मेळावा घेवुन दमदार एन्ट्री केल्याने इच्छुक उमेदवारांच्या धास्ती वाढल्या असुन राजकीय वर्तुळात निवडणुकीबाबत जोरदार चर्चा रंगत आहे. तुळजापूरची  जागा हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या स्वप्नापोटी आघाडीतून ठाकरे गटाला जागा सुटणार? अशी शक्यता वर्तवली जात आहे.


ईच्छकाकडुन गावोगावी कार्यकर्त्याचा मेळावा, खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम, शेतकरी मेळावा , रोजगार मेळावा, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, साडी वाटपाचा कार्यक्रम करीत आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र बॅनरबाजी करत इच्छुकांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच  अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.दरम्यान  भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धिरज पाटील यांच्यात उजनीच्या पाण्यावरून राजकिय वातावरण चांगलेच  तापले आहे . खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एन्ट्री घेतल्याने  महाआघाडी व महायुती मध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय रणांगण गाजत आहे.  पहिल्यांदाच इच्छुकांच्या भाऊगर्दीने "तुळजापूर" कडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

धाराशिव लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतदार   तुळजापूर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला कौल देणार या आशेने इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन पक्ष श्रेष्ठीकडे वाऱ्या करत आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा  मतदारसंघ आहे.तुळजापूरचा उल्लेख केल्याशिवाय धाराशिवची ओळख पूर्ण होत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा आशिर्वाद घेऊनच अनेक पक्ष आपल्या प्रचाराला सुरुवात करतात.
गेल्या पंचवार्षीक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राणाजगजितसिंह पाटील विजयी झाल्याने तुळजाभवानीच्या दरबारात पहिल्यांदाच कमळ फुलले. पाच वेळा निवडून आलेले काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला. २०१९ च्या निवडणुक रिंगणात १८ उमेदवार होते. यावेळी तिरंगी लढत झाली. त्यात भाजपचे राणाजगजितसिंह पाटील हे २३ हजार १९६ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले.
श्री. पाटील यांना ९९ हजार ३४ मते मिळाली तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांना ७५ हजार ८६५ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांना ३५ हजार १५३ मते मिळाली.


२४१ तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या ३ लाख ८० हजार ८०६ असुन त्यापैकी  पुरुष मतदार २ लाख १०६  तर स्त्री मतदार १ लाख ८० हजार ६९४ एवढे आहे. या मतदारसंघात धाराशिव तालुक्यातील ७२ गावे, तुळजापूर तालुक्यातील १२३ आहे . तुळजापूर व नळदुर्ग नगरपालिका असे मिळुण एकुण १९५ गावाचा मतदारसंघात समावेश आहे. तर एकूण  मतदान केंद्र ४१० आहेत.

 या मतदारसंघातून  पहिल्यांदाच अपक्ष म्हणून  हगलूर ता. तुळजापूर येथील शेतकरी पुत्रअण्णासाहेब दराडे हे निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केल्याने मतदारास राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य, संरक्षण याबाबत सरकारची उदाशिनता, उजनी धरणाच्या पाण्याचा प्रलंबित प्रश्न,शेती मालाचे अस्थिर भाव,असे जिव्हाळ्याचे विषय त्यांनी आपल्या प्रचाराचे मुद्दे घेऊन "परिवर्तन रथयात्रा" या मतदारसंघातून काढत असून प्रत्यक्षात उजनी धरणातील पाणी टॅंकरव्दारे आणुन  प्रत्येक गावातील मारुतीच्या मंदिरात जाऊन उजनी धरणाच्या पाण्याने जलाभिषेक घालून प्रचाराचा धुमाकूळ घातला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे  उद्योजक  अशोकभाऊ जगदाळे यांनी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.गावभेटी, महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम आयोजित करणे,तरुणांसाठी रोजगार महामेळावा तर शेतकरी मेळावा आयोजित करणे, असे कार्यक्रम आयोजित करून वातावरण निर्माण केले आहे.भावी आमदार म्हणून गावागावात बॅनरबाजी केली आहे. ते या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे दिसून येत आहे.पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ पुर्वीपासून राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, ॲड धिरज पाटील, विश्वास अप्पा शिंदे आदी इच्छुक आहेत.

मंगळवार दि.०८ ऑक्टोंबर रोजी  इटकळ त्या. तुळजापूर  गावात शिवसेना (उबाठा ) गटाकडून शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला .यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सह संपर्कप्रमुख मकरंद राजे  निंबाळकर आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
 
 निवडणुकीपूर्वीच वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवताना दिसुन येत आहे. त्यातच आता शिवसेना उबाठा गटाने मतदारसंघात पहिला शिवसैनिकाचा भव्य मेळावा घेवुन महाविकास आघाडीकडुन तुळजापूरच्या जागेसाठी दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हिंदु ह्रदयसम्राट  स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे तुळजापूर विधानसभेवर भगवा फडकावण्याचे स्वप्न आहे.तुळजापूरच्या जागेसाठी आघाडीत मोठी चुरस निर्माण होताना दिसत आहे. ही जागा शिवसेनेला सुटल्यास मकरंद राजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तगडी लढत देणारा प्रबळ उमेदवार ठरणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 
Top