नळदुर्ग तालुका निर्मितीचा मार्ग सुकर; अप्पर तहसील कार्यालयाचा शासन निर्णय जारी 

नळदुर्ग शहरात लवकरच अप्पर तहसील कार्यान्वित होणार : आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती


नळदुर्ग,दि.०९:

 स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीचा मार्ग आता सुकर झाला आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला सततच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने न्याय दिला आहे. नियोजित नळदुर्ग तालुका निर्मितीच्या प्रक्रियेचा सर्वात महत्वपूर्ण भाग असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा शासन निर्णय मंगळवारी सायंकाळी निर्गमित करण्यात आला आहे.  या शासन निर्णयामुळे  लवकरच नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.


आमदार पाटील पुढे म्हटले की,  नळदुर्ग शहरात अपर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तत्कालीन ठाकरे सरकारने नाकारला होता. अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असल्याचे कारण देत या प्रस्तावाला ठाकरे सरकारने केराची टोपली दाखवली असल्याचे सांगुन महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने हा प्रस्ताव पुन्हा सादर केला. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार  यांनी या प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता दिली. आणि गौरी गणपतीच्या शुभ मुहूर्तावर नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर महिन्याच्या आत शासन निर्णय जारी करत नळदुर्गवासीयांच्या ५० वर्षांपासून असलेल्या मागणीला महायुती सरकारने न्याय दिला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 
 
 तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर तथा अणदूर, जळकोट, नंदगाव व शहापूर या महसुली मंडळातील नागरिकांची पन्नास वर्षांपासून स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीची मागणी होती. तुळजापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र व गावांची संख्या विचारात घेवून नळदुर्ग येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करण्याच्या मागणीसाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी हा प्रश्न  तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे मान्यतेच्या प्रक्रियेला गती मिळाली. पाच ऑगस्ट रोजी अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि वित्त विभाग यांच्या उपसमितीच्या पाचव्या बैठकीत अपर तहसील कार्यालय स्थापन करून, दोन पदे निर्माण करण्यास मान्यत देण्यात आली होती. आणि सदरील प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीकडे पाठविण्यात आला होता. त्यास 11 सप्टेंबर रोजी गौरी गणपतीच्या शुभ मुहूर्तावर उच्चस्तरीय सचिव समितीकडून मान्यता देण्यात आली होती. 

मंगळवार दि.०८ ऑक्टोंबर रोजी
 सायंकाळी महायुती सरकारने नळदुर्ग अपर तहसील कार्यालयाचा शासन निर्णय निर्गमित केला असून नळदुर्ग अप्पर तहसील कार्यलयाकडे नळदुर्ग व जळकोट मंडळातील 36 गावांचा तर तुळजापूर तहसील कार्यलयाकडे तुळजापूर, मंगरूळ,सावरगाव,सलगरा व इटकळ मंडळातील 87 गावांचा अंतर्भाव असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

 स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीच्या अनुषंगाने हा महत्वपूर्ण टप्पा असून नागरिकांना सुविधा देण्यासाठी नळदुर्ग येथे होत असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या मान्यतेबद्दल आमदार पाटील यांनी महायुती सरकारचे  आभार व्यक्त केले आहेत. तसेच अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्णत्वास नेल्याबद्दल नळदुर्ग शहर आणि परिसरातील नागरिकांनी आमदार पाटील यांचे अभिनंदन केले.
 
Top