तुळजापूरच काय मराठवाड्याच्या विकासाचा पाया रचणारे व्यक्तीमत्व!
राजकारणात सत्तरीकडे वाटचाल!
विशेष वृत्त तुळजापूर विधानसभा
शिवाजी नाईक
काहीही झाले तरी विधानसभा निवडणूक तुळजापूर मतदारसंघातून लढविणारच आहे. त्याकरिता मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे सांगुन राज्यतील व काॕग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग शहरात आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
मधुकरराव चव्हाण यावेळी बोलताना पुढे म्हणाले की,माझे कुटुंब सहा दशकांपूर्वी पासून काँग्रेसशी एकनिष्ठ संबंधित आहे. आम्ही काँग्रेस पक्षाच्या विचाराशी बांधील राहिलो आहोत.
तुळजापूर तालुका, धाराशिव जिल्हा व मराठवाड्याच्या विकासाचा पाया रचण्याचे काम करण्याचे भाग्य मला लाभले. मात्र आज घडीला त्यावर कितीही विकासाची शिखरे रचली तरी मी रचलेल्या पायास काही होत नाही व माझ्या कामाचे मोलही कमी होत नाही असे सांगतानाच श्री चव्हाण यांनी मागील ६० वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक पदं उपभोगताना स्वतःच्या मुलांना कुठले पद दिले नाही. उलट तालुक्यातील सर्व जाती- धर्माच्या पदाधिकार्यांना विविध पदं दिली. यामध्ये पंचायत समिती सभापदी पद, जिल्हा परिषद अध्यक्ष पद यासह विविध शासकीय, निमशासकीय, सहकार क्षेत्रात समाजातील सर्व घटकांना संधी दिल्याचे आवर्जून सांगितले.
मराठवाड्याचे हक्काचे २१ टीएमसी पाण्यासाठी सतत पाठपुरावा केला, विधानसभेतील भाषण, विकासात्मक केलेल्या मागणी याचे सर्व रेकाॕर्ड उपलब्ध आहेत. याउलट आजच्या शासनकर्त्यांनी व लोकप्रतिधींनी कमी पाण्यावर समाधान मानले आहे. मी एकट्याने तुळजापूर तालुक्यात तब्बल ऐंशी लहान मोठे साठवण तलाव बांधले असल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्या पिढीतील राजकीय नेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अण्णांचे वय ९० असले तरी त्यांच्यात उत्साहाची कोणतीही कमी नाही. २०१९ च्या निवडणुकीत झालेला पराभव बाजूला सारून आता त्यांनी काँग्रेसकडून दंड थोपटले आहेत. अण्णा या टोपणनावाने परिचित असलेले काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले आहेत. ते कॅबिनेटमंत्रीही राहिलेले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुनील चव्हाण हे श्री तुळजाभावनी सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळतात. अडचणीत असलेल्या या कारखान्याला महायुती सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. सुनील चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.
मधुकरराव चव्हाण हेही भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी अफवा त्यावेळी पसरली होती. त्याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यानंतर चव्हाण यांनी त्या अफवा असल्याचे खुलासा केले .
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारात ते सहभागी होवुन चव्हाण यांच्या अणदूर गावातून राजेनिंबाळकर यांना मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या चर्चाला पुर्णविराम मिळाले.
"मराठवाड्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे . त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडतो . हा दुष्काळ कायमचा घालवायचा असेल तर मराठवाड्याला २१ टीएमशी पाणी मिळाले पाहिजे .या पाण्यासाठीचे मंतरलेले दिवस माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी अनुभवले ..! मराठवाडा विकासाच्या अनुशेषासंबंधी आग्रही भूमिका मांडणारे माजी मंत्री चव्हाण यांनी शेती , उद्योग , दळणवळण , पायाभूत सुविधा ,सिंचन , पर्यटन , बेरोजगारी ,सहकार , आरोग्य शिक्षण आणि अर्थव्यवस्था या महत्त्वाच्या विषयांकडे शासनाचे लक्ष वेधून तालुक्यासह मराठवाडा विकासाला प्राधान्यक्रम देत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शाश्वत विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेतले "