माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शक्ती परीक्षण करत अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवारी केले दाखल

तुळजापूर ,दि.३०: शिवाजी नाईक 

 तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तुळजापुरात  मोठे शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल केली.


काँग्रेस पक्षाने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना तुळजापूरची उमेदवारी न दिल्याने त्यानी  निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तुळजापुरात भव्य रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.

सात दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ  राहिलेल्या , पाचवेळा आमदार म्हणून भुषविलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मंगळवारी तुळजापुरात भव्य रॅली काढून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले.रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना चव्हाण  म्हणाले की,७० वर्ष ज्या पक्षाची सेवा केली, कुटुंबापेक्षा ही पक्षाला जपले, वाढवले,  त्याच पक्षाने मला एकनिष्ठतेचे फळ म्हणून की काय मला  विश्वासात न घेता, कुठलेही कारण न सांगता उमेदवारी दिली नाही, आज त्यांना सोडून केवळ कार्यकर्त्यांच्या इच्छे खातर मी ही निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार पक्का केला. कार्यकर्त्याच्या जीवावर  ही निवडणूक जनतेच्या हितासाठी आपण लढवणार आहे. ५ वेळा जनतेनी मला मोठे मताधिक्य देऊन या मतदार संघातून विजयी केले असून याही वेळी नक्कीच जनता मलाच निवडून देणार असा विश्वास माजी  चव्हाण यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांना हा निर्णय घेताना चव्हाण भावनिक झाले होते. या वेळी एका,मुस्लिम महिला कार्यकर्तीने १०हजार रुपये,तर अणदूर चे मनोज मुळे व ढोबळे गुरुजींनी ५ हजार रुपये साहेबांना निवडणूक निधी म्हणून सुपूर्त केला.

यावेळी मुकुंद डोंगरे, ऋषिकेश मगर, डॉ नागनाथ कुंभार, बाबुराव चव्हाण,प्रकाश चव्हाण, अरुण दळवी, शरणाप्पा कबाडे,आझर मुजावरसह मधुकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक ,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या भाषणात काँग्रेसने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी नाकारुन  अन्याय केला असून चव्हाण यांनी तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवावी अशी विनंती केली, 

यावेळी व्यासपीठावर,अशोक पाटील, लक्ष्मण सरडे, दिलीप सोमवंशी ,अशोक मगर, लक्ष्मण शिंदे, साधू मुळे , चव्हाण समर्थक उपस्थित होते. याप्रसंगी आबा तोडकरी, सुनील रोचकरी, सिद्धू मुळे, धनराज मुळे, आप्पू धमुरे, संगप्पा हगलगुंडे, गौरीशंकर कोडगिरे,अख्तर काझी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित हंगरकर यांनी केले.

  
 
Top