महानायक नाईक यांचे स्मारक राज्यातील सर्वात सुंदर स्मारक असेल - आमदार राणाजगजितसिंह पाटील
हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
नळदुर्ग, दि. १४ : शिवाजी नाईक
हरित क्रांतिचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्मारक राज्यातील सर्वात चांगले आणि अभिमानास्पद असेल. यातून अनेकांना चिरंतन प्रेरणा मिळणार आहेत. स्मारक अधिक समर्पक आणि भव्यदिव्य करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्यासाठी महायुती सरकारनेही अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे. दिवंगत नाईक साहेबांच्या यांच्या विचारांचा हा खराखुरा सन्मान आहे. असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
नळदुर्ग येथील वसंतनगर येथे उभारण्यात येत असलेल्या दिवंगत वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन रविवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील बंजारा समाज बांधवांच्या बाबतीत महायुती सरकारने नेहमीच आस्था बाळगलेली आहे. यापुढेही त्यात तसूभर फरक पडणार नाही. आपल्या महायुती सरकारने आता राज्यातील तांड्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यापक विकास आराखडा तयार करण्याचे नियोजन केले आहे. विकास आराखड्यानुसार सर्व तांड्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. राज्यातील कृषी क्षेत्राला अभिमानास्पद आयाम देणाऱ्या हरित क्रांतीचे प्रणेते राहिलेल्या वसंतराव नाईक यांच्या स्मारकाच्या कामापसून या सर्वांगीण विकासाचा शुभारंभ होत असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी नमूद केले.
दिवंगत मुख्यमंत्री नाईक यांच्या स्मारकाचे आपल्या सर्वांच्या साक्षीने भूमिपूजन झाले आहे. यानिमित्ताने एकमेकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आज आपण एकमेकांना शब्द देत आहोत. मात्र त्यासाठी सर्व बंजारा समाज बांधव आणि भगिनींनी आपल्या महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे. नाईक यांच्या स्मारकाच्या माध्यमातून ही नवी सुरुवात आहे. पुढील काळात आपल्याला आणखी नवनवे टप्पे गाठायचे आहेत. आपल्या भागातील तरुणांना आपल्याला हक्काचा रोजगार उपलब्ध करुन द्यायचा आहे. नवनवे उद्योग आपल्या भागत आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. कौडगाव येथे एमआयडीसीच्या माध्यमातून तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. पायाभूत सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात आपल्या सरकारने २४ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. याठिकाणी दहा हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. तामलवाडी येथेही ३७० एकरावर एमआयडीसी साकारण्याचे काम सुरू आहे. तेथेही सोलापूर जिल्ह्यातील दीडशेहुन अधिक उद्योजक गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे तामलवाडी एमआयडीसीत १२ हजार रोजगार निर्मितीचे आपले उद्दिष्ट आहे. हे सर्व एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी आपल्या सर्वांचे पाठबळ आणि सहकार्य महत्वाचे असल्याचे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
राज्यात १९७२ साली भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब होते. त्यावेळी ते स्वतः नळदुर्ग येथे आले होते. त्यांच्या पदस्पर्शामुळे वसंतनगराचा हा परिसर पावन झालेला आहे. या पावन भूमीवर नाईक साहेबाचे स्मारक असावे अशी बंजारा समाज बांधवांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती. आपल्या माध्यमातून या मागणीला मूर्त रूप येत आहे. नाईक साहेबांचे स्मारक साकारण्याची संधी आपल्याला लाभली हे आपले भाग्य असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी भाजपाचे विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारणी सदस्य विद्यानंद राठोड व त्यांच्या टीमने वसंतराव नाईक साहेबांच्या स्मारकासाठी परिश्रम घेतल्याने त्यांचे टाळ्या वाजून स्वागत करण्यात आले.तर संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे धाराशिव जिल्हा अशासकीय सदस्य प्राचार्य संतोष चव्हाण व विलास राठोड यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना तांडा समृद्धी योजनेचा विकास आराखडा सादर केला. यावेळी तुळजापूर तालुका बंजारा बांधवांच्या वतीने व वसंतराव नाईक साहेब स्मारक समितीच्या वतीने आमदार पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला. तर शासनाच्या संत सेवालाल बंजारा तांडा समृद्धी योजना नागपुर विदर्भ कमीटीवर अशासकीय सदस्य पदी प्रविण पवार यांची निवड झाल्याबद्दल आमदार पाटील यांनी सन्मान केला .
याप्रसंगी भाजपाचे विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारणी सदस्य विद्यानंद राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश दंडनाईक , सुशांत भूमकर , किसान मोर्चाचे रामदास कोळगे , माजी जि.प.सदस्य गणेश सोनटक्के,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सिध्देश्वर कोरे, ताराबाई पवार , प्रशांत लोमटे, साहेबराव घुगे,अप्पू जेवळे , विवेकानंद मेलगिरी ,भिवा इंगोले, युवराज पाटील, धिमाजी घुगे, , श्रमिक पोतदार, भिमाशंकर बताले ,पद्माकर घोडके , नळदुर्ग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निरंजन राठोड ,छमाबाई राठोड , आनिल पवार , शिवाजी चव्हाण, दामाजी राठोड, वसंत पवार, भिमराव पवार, रवी महाराज राठोड यांची प्रमुख उपस्थितीत होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास राठोड,निरंजन राठोड , प्रवीण पवार , महेश चव्हाण यांनी पुढाकार घेतले .
मराठवाड्यातील नळदुर्ग जि.धाराशिव येथे भारताच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या वसंतराव नाईक स्मारकाचा भूमिपूजन समारंभ यशस्वीपणे पार पडला व पुढील दोन दिवसात कार्यारंभ आदेश मिळणार असून प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक श्री.हरिश्चंद्र राठोड, वय वर्ष १०५ यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आशीर्वाद दिले. अशा प्रेरणादायी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि आपले सर्वांचे सहकार्य या कामासाठी महत्त्वाचे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.