राज्यातील पहिल्या बसवसृष्टीच्या जागेचा प्रश्न मिटला;
महायुती सरकारने विशेष बाब म्हणून घेतला निर्णय
धाराशिव, दि. १५
नळदुर्ग शहरात साकारल्या जाणार्या राज्यातील पहिल्या बसवसृष्टीच्या जागेचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. मंगळवारी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नळदुर्ग पालिकेची स्मारकासाठी देऊ असलेल्या 6 एकर जागेच्या आरक्षण बदलाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच पाच कोटी रूपयांचा निधी बसवसृष्टीसाठी उपलब्ध झालेला आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून लवकरच राज्यातील पहिली भव्यदिव्य आणि आकर्षक बसवसृष्टी आकाराला येणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे बसवसृष्टी उभारण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी लावून धरली होती. याविषयी आपण सातत्याने पाठपुरावा करून नळदुर्गजवळ राष्ट्रीय महामार्गालगत असलेली वाहनतळासाठी आरक्षित जागा बसवसृष्टीसाठी मिळावी याकरिता सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. नळदुर्ग शहराचा विकास आराखडा राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे त्याअंतर्गत वाहनतळासाठी आरक्षित असलेली ही सहा एकर जागेवरील आरक्षण बदलून बसवसृष्टीसाठी देण्यात यावी, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली होती.परंतु या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने या 6 एकर जागेसाठी विशेष बाब म्हणून आरक्षण बदलून देण्यासाठी आपण सरकारकडे मागणी केली होती. आपल्या मागणीनुसार मंगळवारी विशेष बाब म्हणून या जागेवर बसवसृष्टी आणि वसंतराव नाईक स्मारकासह विस्तृत उद्यान उभारण्यासह इतर अनुषंगिक बाबीसाठी 10% जागेवर बांधकाम करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याने एकूण सहा एकर असलेल्या या जागेतील पाच एकर क्षेत्रावर महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा अश्वारूढ पुतळा, ध्यानकेंद्र, आकर्षक बागबगीचा, सुशोभिकरण, त्याचबरोबर लाईट अॅन्ड साऊंड-शो करण्याचे ठरविले असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.
राज्यातील पहिली आकर्षक भव्यदिव्य अशी बसवसृष्टी या ठिकाणी आकाराला येणार आहे. तर उर्वरित एक एकर क्षेत्रावर हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे समारक आणि उद्यान विकसित केले जाणार आहे. हे ठिकाण एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून राज्याच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याचाही उद्देश आहे. त्यासाठी सहा एकर जागेचे आरक्षणात विशेष बाब म्हणून बदल केल्याबद्दल महायुती सरकारचे धन्यवाद, लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तो उपलब्ध करून देण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.