ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची प्रचाराकडे पाठ; अ‍ॅड.धीरज पाटील अडचणीत?

नळदुर्ग,दि.शिवाजी नाईक 

निवडणूक प्रचाराला आठवड्याचा कालावधी राहिला आहे.निवडणुक प्रचाराला तुळजापूर विधानसभा मतदार संघात वेग आला असताना  महाविकास आघाडीचे दिग्गज नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली असल्यामुळे या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारात एकाएकी झुंज देताना दिसत असुन चव्हाण व जगदाळे यांचे नाराज समर्थकांची कोणाला फटका बसणार, त्यांचा कोणाला फायदा होणार याबाबत मतदारांत जोरदार चर्चा रंगली आहे.

  तुळजापूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष  अ‍ॅड.धीरज पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी जोरदार प्रयत्न केले होते.त्याचबरोबर निवडणुक पुर्वी मतदारसंघ पिंजून काढत जोरदार तयारी केली होती. मात्र यामध्ये उमेदवारी मिळवण्यात अ‍ॅड.धीरज पाटील यांना यश आले होते.काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व महाविकास आघाडीचे नेते अशोक जगदाळे या दोन दिग्गज नेत्यांना डावलून अ‍ॅड.धीरज पाटील यांना उमेदवारी देऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेले जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण व अशोक जगदाळे यांनी बंडखोरी करत तुळजापूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कॉग्रेस पक्ष श्रेष्टीला मधुकरराव चव्हाण व अशोक जगदाळे यांची नाराजी दूर करण्यात यश आले. यावेळी मधुकरराव चव्हाण व अशोक जगदाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. 

आता या मतदार संघात महायुती भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड.धीरज पाटील यांच्यात लढत  होत आहे. सध्या या मतदार संघात प्रचार शिंगेला पोहचला आहे. मात्र या प्रचाराकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण  व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे या दोन दिग्गजांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. हे दोन नेते एकदाही महाविकास आघाडीच्या प्रचारात दिसले नाहीत. त्याचबरोबर या दोन नेत्यांचे समर्थकही सध्या महाविकास आघाडीच्या प्रचारात दिसत नाहीत.
   
त्यामुळे ही बाब महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. आगामी काळात या दोन नेत्यांनी व त्यांच्या समर्थकांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.धीरज पाटील यांचा प्रचार केला नाही किंवा महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाले नाही तर या मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होणे अवघड आहे. असे चित्र दिसून येत आहे.उमेदवारी मिळण्यापूर्वी तुळजापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष   अ‍ॅड. धीरज पाटील यांनी अनेक ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले होते. हे त्यांच्यासाठी या निवडणुकीत डोकेदुखी ठरण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण मधुकरराव चव्हाण व अशोक जगदाळे यांचे समर्थक कार्यकर्ते सध्या हाच मुद्दा उपस्थित करून आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात  जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण व  अशोक जगदाळे यांना पक्षश्रेष्टी समजुत काढण्यात यशस्वी  होईल का? यावर या मतदार संघात महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.
 
Top