मुरुम पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्षा ची स्थापना करावी अंनिसची मागणी
मुरुम, ता. उमरगा, दि.०३
: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात २०१३ साली जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करणेबाबत पोलीस अधीक्षकांना नुकतेच परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
पोलीस महासंचालकांच्या या परिपपत्रकानुसार मुरुम शहर पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी मअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. आप्पासाहेब सुर्यवंशी, सहशिक्षक संतोष कांबळे, सामजिक कार्यकर्ते महेंद्र कांबळे, पत्रकार हुसेन नुरसे, मोहन जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात अंनिसने म्हटले आहे की, राज्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावेत असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने १९ जुलै २०२४ रोजी काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे आश्वासक पाऊल आहे. यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या सहीने असलेल्या आदेशान्वये, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ च्या कलम ५ (१) अन्वये, महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासन सदर अधिनियमातील कलम ५ (२) मध्ये उद्धृत केलेली कर्तव्ये पार पाडण्याकरीता पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त (गुन्हे) तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करणेबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गेल्या अनेक दिवसांपासूनची एक मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. यानिमीत्ताने डॉ. नरेंद्र दाभोलकरांना हे एक कृतिशील अभिवादन ठरेल अशी अपेक्षाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केली आहे.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील पोलीस ठाण्यामध्ये अंनिसच्या वतीने संदिप दहीफळे यांना निवेदन देताना महेश मोटे, सुधीर पंचगल्ले, अप्पासाहेब सुर्यवंशी, संतोष कांबळे व अन्य.