नळदुर्ग शहरातील शिवलिंगेश्वर हिरेमठात अकरा दिवस भरगच्च विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ
नळदुर्ग, दि.०८
नळदुर्ग शहरातील शिवलिंगेश्वर हिरेमठ येथे गुरुवार दि.०७ ते सोमवार दि.१८ नोव्हेंबर या कालावधीत भरगच्च धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर मठात श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पुण्यस्मरण उत्सवानिमित्त विविध धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मठाच्या नव्या वास्तूचे भक्तार्पण, श्री जगद्गुरु रेणुकाचार्य पंचधातू मूर्तीचे प्राण प्रतिष्ठापना, गुरुमाता यांचा तुलाभार, जेष्ठ नागरिकांसह शहरातील सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार समारंभ , मठाधिपती बसवराज शिवाचार्य महास्वामी यांचा जन्मदिन सुवर्णमहोत्सव निमित्त तुलाभार व सहस्त्र सुहासिनी कुंभ मिरवणूक आदी कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहेत.
गुरूवार रोजी सायंकाळी सात वाजता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दररोज सायंकाळी सात वाजता आध्यात्मिक प्रवचन, दररोज विविध समाजातील प्रमुख व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. रविवार व सोमवार (दि.१७ व १८ ) रोजी मुख्य कार्यक्रम होणार आहेत.
१८ रोजी सकाळी सहा वाजता जगद्गुरू रेणुकाचार्य यांची पंचधातुची सुमारे तीस किलोच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर ९.३० वाजता रंभापुरी मठाधिपती वीरसोमेश्वर शिवाचार्य यांची अड्डपालखी मिरवणूक निघणार आहे यावेळी महिलांची सहस्त्रकुंभासह सहभागी होणार आहेत. त्यानंतर ११.३० वाजता असंख्य महास्वामीच्या उपस्थित धर्मसंसद सभा व महाप्रसाद वाटपाने सांगता होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक व अःध्रप्रदेशातील दहा हजार पेक्षा जास्त भक्तगण सहभागी होणार आसाल्याची माहिती शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधिपती बसवराजा महास्वामी यांनी दिली.