४३ कोटीच्या पाणी पुरवठा कामात ठेकेदाराचा मनमानीपणा ; त्रस्त नागरिकांत संताप, ठेकेदाराविरुध्द कारवाईची मागणी
नळदुर्ग, दि.०७: शिवाजी नाईक
नळदुर्ग शहरात केंद्र व राज्य सरकारची महत्वकांक्षी अमृत २ वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या कांही महिन्यापासून सुरु आहे. पाईप लाईन टाकण्यासाठी ठेकेदाराने घिसाडघाईने खोदकाम केल्यामुळे गटारांची तोडफोड झाली,अनेक ठिकाणी गटार बुजली आहेत, रस्त्यावर मुरुम, दगड -गोटे पडल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्याचा सर्वाधिक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकातुन केली जात आहे.
नळदुर्ग शहराच्या उत्तरेस असलेल्या बोरी ( कुरनूर मध्यम प्रकल्प) धरणात मुबलक पाणी असूनही गेल्या अनेक वर्षांपासून आठ ते दहा दिवसाड पाणी मिळणाऱ्या नळदुर्गकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सतत पाठपुरावा करुन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. त्यामुळे लवकरच पाणी प्रश्न सुटणार म्हणुन नागरिक आनंदात असतानाच संबंधित ठेकेदाराने मनमानी व थातुरमातुर काम करुन नागरिकांसमोर अडचण निर्माण करत असल्याने व त्या सोडविण्याऐवजी न.प.प्रशासन लाडक्या ठेकेदारास पाठिशी घालत उलट ३ कोटी ६८ लाख ७१७ रुपयेचा बील नोव्हेंबर मध्ये न.प.ने अदा केले आहे.
सुमारे ४३ कोटी ६७ लाख रूपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. शहरातील विविध भागात ७ जलकुंभ उभारणी करून सन २०५४ च्या लोकसंख्या (३५ हजार) गृहीत धरून ही योजना आमलात आणली जाणार आहे. ५ हजार ९५ नळजोडणी होवू शकेल. सध्या दरडोई ७० लीटर पाणी पुरवठा होतो या योजनेनंतर १३५ लीटर दरडोई दररोज पाणीपुरवठा होईल.
सात ठिकाणी होणार जलकुंभ
जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ११ लाख ७० हजार लिटर , बौद्धनगर १ लाख ६५ हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. उपजिल्हा रूग्णालय ४ लाख लिटर,अक्कलकोट रस्ता २ लाख लिटर, महामार्गालगत हुतात्मा गार्डन १लाख लिटर , वसंतनगर २ लाख २५ हजार लिटर, नगरपरिषद इमारत जवळ ६ लाख लिटर क्षमता. सोलर पॕनेल असलेले उंचीवरील जलकुंभ असेल तसेच सध्याच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणीच नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे काम सुरु आहे.
दि.26 जुन 2024 रोजी सुजाता कंन्स्ट्रकशनने पाणी पुरवठयाचे काम सुरू केले. प्रारंभी शहरात खोदकाम करून जलवाहिनी वितरिका टाकण्याचे काम सुरू केले. शहरात मुख्य जलवाहिनी वितरिकेची लांबी सुमारे 2 कि.मी तर अंतर्गत जलवितरण व्यवस्था सुमारे 56 कि.मी. लांबीची आहे.
शहरातील वसंतनगर, दुर्गानगर, इंदिरानगर, रामलिलानगर, ठाकरेनगर, प्राध्यापक कॉलनी, कॉलेज सर्व्हिस रोड, जगतापनगर, रहिमनगर, अदि ठिकाणी चार किलो मिटर खोदकाम करून पाईप टाकण्यात आले आहे. दरम्यान खोदकाम करत असताना सर्वत्र रस्त्याची वाट लागल्याचे दिसुन येत आहे. रस्ते उखडल्याने दगड, गोटे रस्त्यावर अस्त व्यस्त विखुरलेले आहेत. त्याचा रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर खोदकाम करताना जागोजागी गटार फुटली आहे. त्यामध्ये दगड गोटे,माती पडून गटार पूर्णपणे बुजून गेली आहे. सर्वत्र गटारी तुंबून दुर्गंधी पसरली आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खोद कामावेळी नळाचे पाईप तुटले आहे. तुटलेल्या नळ जोडणी व्यवस्थितरित्या करुन दिले नाही . नागरिकांच्या असंख्य तक्रारी नंतर संबंधीत ठेकेदाराने थातुर मातुर काम केले. नळ जोडण्या केलेल्या पाईपला गळती लागल्याचे नागरिकांच्या तक्रारीं असुन रस्त्यावर पडलेले मुरूम दगड गोटे काढणयाचे ठेकेदाराचे काम असताना ते अर्धवट स्थितीत आहे. आजही त्याचा नाहकच त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
याप्रकरणी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते रजेवर असल्याने त्यांच्याशी संपर्क होवु शकले नाही.न.प.प्रशासनाने सुजाता कंन्स्ट्रकशनला दि.१ ऑक्टोंबर रोजी लेखी पत्र देऊन काम बंद करण्याचे कळविल्याचे पाणीपुरवठा विभाग अभियंता दिक्षा सिरसट यांनी तुळजापूर लाईव्हशी बोलताना सांगितले.
ठाकरेनगर येथे खोदकाम करताना गटार बुजलेली आहे.गटार तुंबल्याने सांडपाण्याचा निचारा होत नाही. सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य् पसरले आहे. डास, मच्छरच्या संख्येत वाढ झाली आहे. या भागातील नागरिक त्रस्त असल्याचे अजय देशपांडे यांनी बोलताना सांगितले आहे .
ठेकेदारास बिल अदा करू नये
वसंतनगर मध्ये रातोरात खोदकाम करुन मुरूम दगड रस्त्यावर टाकून दिल्याने लहान बालके व वृद्ध नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. घाई गडबडीत रात्रीतुन थातुरमातुर काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करावी ,तोपर्यंत पालिकेने ठेकेदारास बिल अदा करू नये.
रवी महाराज राठोड वसंतनगर नळदुर्ग