तुळजापूर: मराठवाडा विभाग स्तरीय वक्तृत्व स्पर्धां ; विद्यार्थ्यांची वक्तृत्वाच्या सादरीकरणतून  केली प्रगल्भ विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी

 तामलवाडी ,दि.०२

मंगरूळ ता . तुळजापूर येथील स्वातंत्र्यसंग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त मराठवाडा विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन आयोजक राजकुमार धुरगुडे यांच्या हस्ते सैनिक विद्यालय तुळजापूर येथे संपन्न झाले .यावेळी मंचावर प्राचार्य वैजनाथ घोडके , सुदर्शन शिंदे ,ज्ञानेश्वरी शिंदे -नरवडे , शिवशंकर जळकोटे या मान्यवरांची उपस्थिती होती .प्रत्येक शाळेतील विजेता स्पर्धक यामध्ये सहभागी झाला होता . 50 स्पर्धकांनी यात आपल्या वक्तृत्व कलेचे सादरीकरण केले .

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात वक्तृत्वाचे असाधारण महत्त्व आहे . वक्तृत्व म्हणजे शब्दांची जुळवाजुळव नसून ती विचारांची निर्मिती , तर्कशुद्धता आणि मनाचा ठाव घेणारी कालात्मकता असते . आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची क्षमता याद्वारे निर्माण होते . यावेळी उद्घाटक राजकुमार धुरगुडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना वक्तृत्व कला ही जीवनात महत्त्वाची आहे .विद्यार्थ्यांनी यश मिळेपर्यंत प्रयत्नाची पराकाष्टा करावी .आयुष्यात प्रामाणिकपणा अंगी बाळगा , आपल्या अपयशाची व चुकांची जबाबदारी स्वीकारून त्या सुधारण्याचा प्रयत्न करा हा मार्ग तुम्हाला नक्कीच यशस्वी करतो असे सांगितले .स्पर्धेतील हे जीवन सुंदर आहे , शेतीतून समृद्धीकडे : शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग व छत्रपती महाराणी ताराबाई या विषयावर मुलांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले .विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील आत्मविश्वास , निपुणता आणि विषयांचे अचूक ज्ञान आणि अभ्यासपूर्ण व प्रभावी मांडणी यांनी सर्वांनाच प्रभावित केले .

केवळ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात वक्तृत्व उपयुक्त ठरते .विद्यार्थ्यांनी सदर विषयांच्या अनुषंगाने मुद्देसूदपणे विचार मांडत श्रोत्यांनाही अंतर्मुख करत ,आपल्या प्रगल्भ विचारांचे प्रकटीकरण केले .यात वसुंधरा गुरव - प्रथम क्रमांक पटकावला तर श्रावणी कौर - द्वितीय , कांबळे पंचशीला -तृतीय , जाधव अनन्या - चतुर्थ क्रमांक व पाचवा क्रमांक श्रद्धा हत्ते हीने मिळवला .विजेत्यांना रोख रक्कम ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते उद्या तुळजापूर येथे होणार आहे .यासाठी शिवशंकर जळकोटे , तानाजी म्हेत्रे ,ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे ,महेंद्र कावरे ,अशोक मर्डे , विठ्ठल नरवडे ,डॉ . जेटीथोर , भैरवनाथ कानडे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . विविध शाळातील शिक्षक , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार सुरज धुरगुडे यांनी मानले .
 
Top