पौष पौर्णिमेनिमित्त श्री खंडोबा यात्रेत ‘यळकोट यळकोट’ च्या जयघोषाने मैलारपूर दुमदुमले
नळदुर्ग, दि.१४: नवल नाईक
नळदुर्ग शहराच्या उत्तरेस श्री क्षेत्र मैलारपुरात
श्री .खंडोबा व बाणाईचा विवाह (नळदुर्गमध्ये ) झाल्याची अख्यायिका असल्यामुळे नळदुर्गला वेगळेच महत्त्व असुन पौष पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र मैलारपुर खंडोबा यात्रेत सोमवार दि. १३ रोजी ‘यळकोट यळकोट’ च्या जयघोषाने व पाच लाखापेक्षा अधिक भाविकांची दर्शनासाठी व आपला नवस फेडण्यासाठी गर्दी उसळली होती. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती.
सोमवार रोजी दिवसभर आपला नवस फेडण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून व परराज्यातून एस.टी. बसेस व खासगी वाहनातून येणा-या भाविकांची एकसारखी रिघ लागल्याचे चित्र दिसुन आले.
खंडोबा व बाणाईचा विवाह नळदुर्गमध्ये झाल्याची अख्यायिका असल्यामुळे नळदुर्गला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या यात्रेतील पौष पौर्णिमेचा सोमवार हा मुख्य दिवस असल्याने रविवारपासुनच भाविकांची वर्दळ सुरु झाली. पहाटेपासून हलगीच्या निनादामध्ये भक्तांनी दिवसभर श्री चे दर्शन, अभिषेक व इतर धार्मिक विधीसाठी मंदीर परिसरात मोठी गर्दी केली होती. तर वारू जेवू घालणे, तळी उचलणे, वाघ्या मुरळीचा नाच, पट बांधणे, श्री ला नैवैद्य दाखवणे, काठ्या नाचवणे यासह मंदिरावर बेल, भंडारा व खोब-याची मुक्त उधळण करीत “यळकोट यळकोट घे” च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणुन गेला.
यात्रेकरुसाठी नळदुर्ग ते मैलारपुर हा मुख्य रस्ता असल्यामुळे वाहनाच्या रहदारीमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत होता. यात्रेत गगनचुंबी पाळणे, खेळणीची दुकाने, मौत का कुआ, नारळ व प्रसादाची दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, हॉटेल यासह इतर व्यावसायिकांनी मोठ्याप्रमाणावर आपली दुकाने थाटली.
भाविकांसाठी नळदुर्ग नगरपालिकेने पिण्याची पाण्याची, विद्युतपुरवठा, प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध केली आहे. आपत्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी सज्ज ठेवली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, अधिकारी चोख बंदोबस्ताकामी तैनात आहेत. त्याचबरोबर भक्तांना सोयी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यात्रेसाठी खास राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसेसची सोय करण्यात आली आहे.
अणदूर व नळदुर्ग (मैलारपूर) येथे दोन वेगळी मंदिरं मात्र देवाची एकच मूर्ती असल्याचे हे दुर्मिळ ठिकाण आहे.