महामार्गावरील मुर्टा पाटी ते गोलाई प्रजासत्ताक दिनी एकेरी वाहतूक सुरू होणार ?
नळदुर्ग,दि.२५:नवल नाईक
सोलापूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाचे मुर्टा पाटी ते नळदुर्ग गोलाई हे काम अंतिम टप्प्यात आले असून महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने 26 जानेवारीला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे अभिवचन दिले होते. त्या दृष्टीने मागील आठवड्यात एस. यु.सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
मैलारपूर येथील उड्डाणपूल , मुर्टा साठवण तलावाचे खालच्या भागातील पुलाचे एका बाजूचे व उपजिल्हा रुग्णालय जवळील पुलाच्या खालील भागाचे काम राहिले असून उर्वरित रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे 26 जानेवारीला एका बाजूने वाहतूक सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आपलं घर जवळील घाट व नळदुर्ग बस स्थानकाकडून उमरगाकडे जाणाऱ्या घाटात वाहन बंद पडणे, वाहन कलंडने यामुळे होणाऱ्या अपघातामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीच्या त्रासापासून काही प्रमाणात मुक्ती मिळणार आहे. मात्र बाह्य वळणाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. दररोज वाहतूक कोंडी तसेच शनिवारी व रविवारी चार ते सहा तासाची वाहतूक कोंडी यामुळे या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक खूपच वैतागले आहेत. लवकरच या त्रासापासून सुटका होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे हे काम मागील एक दशकापेक्षा जास्त कालावधीपासून अनेक कारणांनी रखडले आहे. मात्र यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी यात्रेकरू यांच्यासाठी प्रजासत्तक दिनापासून एका बाजूने वाहतूक सुरू होऊन दिलासा देणारी ही बाब आहे.