राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग ते उमरगा बायपास मार्ग अखेर दहा वर्षानंतर सुरुवात; पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास आणखी काही वेळ लागणार
नळदुर्ग ,दि.२७ :
सोलापूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र ६५ वरील मुर्टापाटी ते गोलाई (नळदुर्ग) बायपास रस्ता तब्बल दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर वाहतुकीसाठी एका बाजूने खुला करण्यात आल. सोमवार दि.२७ रोजी सकाळी दहा वाजता बायपास मार्गे एका बाजूने वाहतूक सुरू झाली आहे.
एस. यु. सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने रस्त्याचे काम केले आहे. मात्र यापूर्वी तीन ते चार कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडून दिल्यामुळे मागील एक दशकापासून काम रखडले होते. सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने जाणारी वाहने या बाह्य वळण मार्गे सोडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने वाहने सोडण्यासाठी अजून काही काम शिल्लक असल्यामुळे आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. यामुळे "आपलं घर" जवळील घाट व नळदुर्ग बस स्थानकाकडून उमरगाकडे जाणाऱ्या घाटात वाहन बंद पडणे, वाहन कलंडने यामुळे होणाऱ्या अपघातामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीच्या त्रासापासून काही प्रमाणात मुक्ती मिळणार आहे. दररोज वाहतूक कोंडी तसेच शनिवारी व रविवारी चार ते सहा तासाची वाहतूक कोंडी यामुळे या मार्गावर प्रवास करणारे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह दक्षिण भारतातील प्रवासी,वाहन चालक खूपच वैतागले आहेत. या मार्गावर ४०० पेक्षा जास्त अपघात होऊन असंख्य मृत्यू, अनेकांना अपंगत्व आल्याचे सर्वश्रुत आहे.
सध्या फक्त एका बाजूने बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात येत आहे. नळदुर्ग घाटातील वाहतूक कोंडीला आळा बसेल ,मात्र एक महिनाभरात बाह्यवळण मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होईल असे
एस. यु. सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चे संचालक बालाजी गायकवाड यांनी सांगितले.