सारथी आणि एमकेसीएलच्या वतीने किल्ले स्वच्छता आणि वारसा जपणूक उपक्रमाचे आयोजन
नळदुर्ग,दि.१५:
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्या. (एम.के.सी.एल.) यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले स्वच्छता अभियानाचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती एम.के.सी.एल. धाराशिवचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर यांनी दिली. सोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या अभिनव उपक्रमामध्ये जिल्हाभरातील जवळपास ४० संगणक प्रशिक्षण केंद्राचे एकूण ४०० विध्यार्थी सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये किल्ल्यांवर असलेला कचरा, उगवलेले गवत यांची साफसफाई करण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यभरात शिवजयंती महोत्सव खूप मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रम राबवून साजरे केले जातात. आपल्या धाराशिव जिल्ह्यामधील विविध शहरातील उपक्रमांना आणि मिरवणूक कार्यक्रमांना राज्यभरातून नावाजले जाते. सारथी आणि एमकेसीएल च्या माध्यमातून किल्ले स्वच्छता आणि वारसा जपणूक या उपक्रमाद्वारे नवीन पिढीला आपल्या किल्ल्यांबद्दल, आपल्या इतिहासाबद्दलची माहिती मिळावी आणि यातूनच या किल्ल्यांचा वारसा जपण्याची जबाबदारीही त्यांना कळावी असा उद्देश ठेवण्यात आला आहे. ऐतिहासिक वास्तू असलेल्या अशा किल्ल्यांची स्वच्छता, साफसफाई करण्याचे नियोजन सारथी आणि एमकेसीएल च्या वतीने संपूर्ण राज्यभरात करण्यात आले आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग आणि परांडा या दोन ठिकाणी ऐतिहासिक किल्ले असून या दोन्ही ठिकाणी ही सर्व संगणक प्रशिक्षण केंद्रे आणि त्यांचे विध्यार्थी मिळून हा उपक्रम राबवणार आहेत.
नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्येयात ४०० विद्याथी स्वच्छता मोहीमेत सहभागी होणार आहेत.किल्ल्यातील
तटबंदीची स्वच्छता,आतील वाढलेले गवत काढणे,विद्रुप झालेल्या भिंतीची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती नळदुर्ग शहरातील शिवम संगणक केंद्राचे संचालक सतीश पुदाले यांनी दिली.