शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरी
मुरुम, ता. उमरगा, दि. १९ :
देशाला महापुरुषांच्या इतिहासाचा वसा आणि वारसा आहे. तो वारसा सर्वांनी जतन करून ठेवणे महत्त्वाचे आहे. तरुणांनी महापुरुषांची जयंती साजरी करून त्यांचे चरित्र वाचून विचार आत्मसात करावेत, असे प्रतिपादन भूगोल विभागाचे प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर यांनी केले.
मुरूम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बुधवारी (ता. १९) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फार्मसी कॉलेजच्या समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र आळंगे होते. यावेळी प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, प्रा. डॉ. सुजित मटका, प्रा. अजिंक्य राठोड, महादेव पाटील, सुभाष पालापुरे, आनंद वाघमोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास डॉ. बारवकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सुरज साठे यांनी शिवाजी महाराजांबद्दल घोषणाबाजी करून वातावरण निर्मिती केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी फेटा, अंगरखा, धोतर, कमरपट्टा तर मुलींनी नऊवारी साडी, पारंपारिक दागिने असा मराठमोळ्या पोशाखात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणारे गीत गाऊन, हातात भगवे ध्वज घेऊन, लेझीमच्या साह्याने नृत्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
अध्यक्षीय समारोपात डॉ. आळंगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे भान ठेवून योजना आखत व बेभान होऊन त्याचे अंमलबजावणी करीत असत. त्यामुळेच ते अनेक लढाया जिंकू शकले. राजमाता जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंधश्रद्धा, भूत प्रेत, भानामती हे थोतांड असल्याचे मानत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुदीप ढंगे, प्रा. पायल आगरकर, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. सदफअलमास मुजावर, प्रा. अनिल मोरे, प्रा. लखन पवार, मल्लू स्वामी, अमोल कटके, किशोर कारभारी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहुल इंजे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनंती बसवंतबागडे तर आभार प्रा. विवेकानंद चौधरी यांनी केले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना मान्यवर व अन्य.