मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उमाकांत मिटकर यांच्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन 

नळदुर्ग,दि.०५ :

“उमाकांत मिटकर यांचा सामाजिक प्रवास अनेक आव्हानांनी व्यापलेला आहे.सर्व अडचणीवर मात करीत त्यांनी सिद्ध केलेली समाजनिष्ठा प्रेरणादायी आहे.समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करण्याची श्री.मिटकर यांची उर्मी निश्चितपणे सकारात्मक बदल घडवून आणणारी आहे.श्री.मिटकर यांच्यासोबत ‘डिव्हाईन जस्टिस’ या पुस्तकाचे लिखाण करणारे श्री. दत्ता जोशी यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो”.असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

नळदूर्गचे सुपुत्र,राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य असलेले श्री.उमाकांत मिटकर यांच्या डिव्हाईन जस्टिस या मूळ मराठी आत्मकथनाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतेच झाले यावेळी ते बोलत होते.

सुमारे दोन दशके भटके-विमुक्तांच्या उत्थानासाठी कार्यरत राहिलेल्या श्री.मिटकर यांची नियुक्ती पुढे पोलीस
प्राधिकरणावर झाली.त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांच्या विरोधात तक्रार असल्यास न्यायाची संधी मिळावी म्हणून हे खंडपीठ मुंबई येथे कार्यरत आहे.एकेकाळी अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या मिटकर यांच्याकडे अन्याय करणाऱ्यांना शासन घडविण्याचे सामर्थ्य या न्यायालयीन नियुक्तीनंतर प्राप्त झाले. निरलस समाजसेवेचे भान पाळत त्यांनी प्रत्येक आघाडीवर आपली नियुक्ती सार्थ ठरवली.त्यांच्या या वाटचालीचा आलेख मांडणाऱ्या मूळ मराठी पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.त्यांचे प्रकाशन तत्कालीन राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी आणि जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते झाले.या पुस्तकाला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले.याच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन जेष्ठ अध्यात्मिक व्यक्तिमत्व व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे प्रमुख श्री.श्री. रविशंकर गुरुजी यांच्या शुभहस्ते पार पाडले.आता हिंदी आवृत्तीचे प्रकाशन मा.श्री. फडणवीस  यांच्या शुभहस्ते पार पडले आहे.हिंदी आवृत्तीच्या पुस्तकाचा  अनुवाद हिंदी भाषेचे प्रकांड पंडित प्राचार्य श्री.वेदकुमार वेदालंकार यांनी केले आहे.

ही पुस्तके तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध झाली आहेत.लवकरच या पुस्तकावर तासाभराचा माहितीपट ही (डॉक्युमेंटरी फिल्म) येत आहे.त्यामुळे श्री मिटकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 
Top