कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी व्याख्यानमाला दोन सत्रात संपन्न ; श्रोत्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नळदुर्ग, दि.२५  : 

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महात्मा गांधी व्याख्यानमालेचे आयोजन मंगळवार दि. २५ रोजी करण्यात आले होते. 

या व्याख्यानमालेच्या  अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड होते. प्रमुख व्याख्याते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र गणापुरे, कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश शेरे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आतिश तिडके, डॉ. विजय सावंत  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सत्राच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व डॉ. मोटे यांचा परिचय डॉ. निलेश शेरे यांनी करून दिला. डॉ. महेश मोटे यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा सत्याग्रहा संबंधीच्या विचारांचे महत्त्व समजावून सांगितले. महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, महात्मा गांधीजींनी दिलेला शांततेचा संदेश आजही जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहे. अहिंसा ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. आज सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया चा नारा दिला जातो. हा विचार देखील महात्मा गांधीजींनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये स्वदेशी, ग्रामस्वराज्य, लोकशाही मूल्य, स्वयंपूर्ण खेडे, इत्यादीच्या माध्यमातून मांडला आहे. 

याप्रसंगी डॉ. अतिश तिडके यांनी डॉ. गणापुरे यांचा परिचय करून दिला. डॉ. राजेंद्र गणापुरे यांनी महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महात्मा गांधीजींनी भारतातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी समतेला महत्त्व दिले. एवढेच नव्हे तर समता प्रस्थापित करण्यासाठी कोणतेच काम हे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते, हा महत्त्वाचा विचार महात्मा गांधीजींनी सांगितला आहे. महात्मा गांधीजींनी विश्वस्ताची संकल्पना मांडली त्या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याकडे असलेला अतिरिक्त पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे परंतु अलीकडच्या काळात असे होताना दिसत नाही. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी महात्मा गांधी यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा व्याख्यानमालेचे आयोजन महत्त्वाचे आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून महात्मा गांधीजींचे विचार, त्यांचे आदर्श तत्त्वज्ञान हे विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजे. त्या विचारांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीस आपले योगदान दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. 

प्रा. बालाजी क्षीरसागर, डॉ. बाळासाहेब पाटील, प्रा. महेश राठोड, उमेश सर्जे, पापा गायकवाड, दिनेश पुदाले, रमेश सर्जे, सिद्ध सुतार आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कीर्ती इटकरी तर आभार प्रा. संगीता मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Top