जवाहर महाविद्यालयात, "सायबर गुन्हेगारी, दक्षता आणि उपाययोजना" विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
अणदुर,दि.१२ : चंद्रकांत हागलगुंडे
जवाहर महाविद्यालयात स्व. शांताकाकी आलूरे महिला सक्षमीकरण कक्ष व इंग्रजी विभागाच्या वतीने ग्रामीण विद्यार्थी व महिलासाठी "सायबर गुन्हेगारी, दक्षता आणि उपाययोजना" विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उदघाटन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कागुंणे यांच्या हस्ते झाले.
उदघाटनपर बोलताना आनंद कागूंणे म्हणाले की, " आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारी आधिक प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येकानी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे " कार्यशाळेसाठी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून अविनाश पाटील, सायबर तज्ञ, सायबर क्राईम पोलीस स्टेशन, सी. पी. ऑफिस सोलापूर यांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी आपण आपल्या नेटवर्कसाठी डिजिटल लॉक लावणे अंत्यत गरजेचे असल्याचे सांगितले.
शॉर्ट फिल्मच्या साह्याने ट्रॅपिंग, ब्लॅकमेलिंग, नेट बँकिंग क्षेत्रातील गुन्हे कसे होतात हे सांगून आपले मोबाईल हॅक कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याचबरोबर त्यांचे सहकारी श्रीरंग कुलकर्णी यांनी अशा गुन्हाची नोंद कशी केली जाते त्यांची प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले. यावेळी अश्विनी लोणी यांनी मुलामुलींचे अपहरण, ब्लॅकमेलिंग याबाबत पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे असे आवाहन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र आलूरे यांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा, त्याचा अतिवापर टाळावा असे सांगितले. तर प्रश्नोत्तराच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थी महिलांनी अनेक प्रश्न विचारले, अविनाश पाटील व त्यांच्या टीमने त्याचे समाधानकारक उत्तर दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ ललिता हिप्परगे, मीरा घुगे, सुजाता पवार,अर्चना कांबळे सुवर्णा झंगे,सना शेख,उषा जाधव, कु. सम्यका मुखे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी स्वागतपर मनोगतात सायबर गुन्हा आणि त्याची जागृती ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.याप्रसंगी कैलास बोगंरगे, उपप्राचार्य प्रा. मल्लिनाथ लंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे प्रस्ताविक कार्यशाळा समन्वयक व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिता मुदकण्णा यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. विवेकानंद वाहूळे यांनी केले तर आभार कु. फौजिया टिनवाले हिने मानले. प्रा. डॉ. मानसी स्वामी यांनी कार्यक्रम नियोजनात सक्रीय सहभाग घेतला आणि नोंदणी विभागाची जबाबदारी पार पाडली. कार्यशाळेसाठी एकूण 145 जणांनी सहभाग नोंदविला.
प्रा.डॉ. प्रसन्न कंदले यांनी सुंदर फलकलेखन करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमासाठी डॉ. ज्योती हत्तरगे, सोनाली जाधव, कु. प्राजक्ता सदाफुले, सानिका स्वामी, सोनाली आलूरे यांचे विशेष सहकार्य मिळाले तर संतोष चौधरी, दिलीप चव्हाण, शुभांगी स्वामी, गणेश सर्जे, सुमित चौधरी, अमित आलूरे, विजय बसवंतबागडे, नामदेव काळे, महादेव काकडे,इ. कर्मचाऱ्यांचे सहकार्य महत्वाचे ठरले. यावेळी सर्व विभागप्रमुख व सहकारी प्राध्यापक यांची उपस्थिती होती.