श्री श्री गुरुकुल येथे पारितोषिक वितरण व आनंद मेळावा थाटात संपन्न
अणदूर, दि.१६ : चंद्रकांत हागलगुंडे
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल येथे वार्षिक बक्षीस वितरण व आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.धम्माल, मज्जा मस्ती, मनोरंजना बरोबरच बौद्धिक खेळ व व्यावसाईक शिक्षणाचा बाल आनंद मेळावा व विविध राज्यस्तरीय व विभागीय क्रिडा स्पर्धा यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे हे होते तर यावेळी उद्घाटक म्हणून नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने,प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ आप्पाराव हिंगमिरे तर उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार,ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके - पाटील,जयश्री व्हटकर,पालक प्रतिनिधी करबसप्पा धमुरे,डॉ हरिदास मुंडे,रुपाली सुत्रावे, मुख्याध्यापक लक्ष्मण नरे,शिवराज भुजबळ यांची उपस्थिती होती.
यावेळी उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार,सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे,प्राचार्य डॉ आप्पासाहेब हिंगमिरे या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.तर अध्यक्षीय समारोप डॉ जितेंद्र कानडे यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर सावंत यांनी.आभार ज्ञानेश्वर बंडगर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सण - उत्सव विभागप्रमुख,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनीपरिश्रम घेतले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा,विभाग आणि राज्यस्तरावरावरील विविध स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या श्रेयस मुळे,समृद्धी माळी,फातिमा शेख,अर्णव कानडे,स्वराली गायकवाड, लक्ष्मी डोंबाळे,वरद जाधवर या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिके,प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला
विविध पदार्थांचा आस्वाद
या आनंद मेळाव्यात एकूण १२२ खाद्यपदार्थ व खेळ यांचे स्टॉल लावण्यात आले होते.यातून जवळपास एक लाख वीस हजारची आर्थिक खरेदी विक्री झाली. पावभाजी,मंच्युरन, ढोकळा,मठा,वडापाव, भेळ आदी पदार्थांचा विद्यार्थी व पालक यांनी आस्वाद घेतला.