मारुती बनसोडे यांना भीमपुत्र आयडॉल २०२५ पुरस्कार जाहीर
नळदुर्ग ,दि.०८
देशातील बारा मान्यवरांना बारामती येथील संविधान विचार मंच बारामती यांच्याकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भीमपुत्र आयडॉल 2025 पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. 20 एप्रिल 2025 रोजी बारामती येथे होणाऱ्या सोहळ्यात या मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे.
मारुती बनसोडे गेली ३८ वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबत १० वर्षे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले सन १९९०-९१ या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म शताब्दी वर्षात अंधश्रध्दा निर्मूलनासाठी १०१ व्याख्याने देण्याचा संकल्प केला व एका वर्षात ११७ व्याख्याने दिली दिनांक.४/८/१९९६ रोजी तुळजापूर येथे राज्यस्तरीय पोतराज प्रथा निर्मुलन परिषद त्यांनी आयोजित केली होती.आज पर्यंत १५२ बाल पोतराजांचे मत परिवर्तन करुन त्यांचे केस कापून त्यांना या प्रथे तून मुक्त केले आहे .१९९६ ला परिवर्तन सामाजिक संस्थेची स्थापना केली त्या माध्यमातुन अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविले आहेत.महिला संघटन बचत गट निर्मिती, पंचायतराज आदी विषयात सतत काम सुरु आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे त्याच बरोबर मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज ,आग्रा येथील कोडिंग मास्टर दिवांश धनगर ,वीज वितरण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ नरहरी केळे, सामाजिक कार्यकर्त्या अकलूजच्या स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील ,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बौद्ध विचाराचे अभ्यासक लखनऊचे राजेश चंद्रा, आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते हैदराबादचे शेख चांद पाशा ,अहिल्या नगरच्या प्रसिद्ध यूट्यूबर आपली आजी उर्फ सुमन धामणे, अहिल्या नगरचे चार्टर्ड अकाउंटंटस शंकर अंदानी, पाणी चित्रपटाचे खरे नायक नांदेडचे हनुमंत उर्फ बाबुराव केंद्रे, क्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील पहिले भारतीय डॉक्टर बारामतीचे डॉ.रोहन अकोलकर नळदुर्ग येथील परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव ,सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे, जेजुरी येथील उद्योजक पांडुरंग सोनवणे यांचा यामध्ये समावेश आहे नोबेल पारितोषिक निवड समितीचे सदस्य डॉ. सुधीर तारे ,ज्येष्ठ नागरिक संघ महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष माधव जोशी ,पुणे विद्यापीठातील मानववंश शास्त्र विभागाच्या माजी प्रमुख प्रा.अंजली कुरणे आणि माजी सनदी अधिकारी डॉ. व्यंकटसाई चेलसानी यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्वांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे या सर्वांच्या कामाची ओळख करून देणाऱ्या त्यांच्या मुलाखती सोशल मीडिया द्वारे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अशी माहिती संविधान विचार मंचचे अध्यक्ष राजेश कांबळे व सचिव घनश्याम केळकर यांनी दिली आहे.