एनसीसी व करिअर कट्ट्याच्या जलदूत विद्यार्थ्यांनी घेतले जलतारा खड्ड्याचे प्रशिक्षण
मुरुम,दि.०७ :
उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जलसाक्षरता कक्षाच्या वतीने तसेच एनसीसी आणि करिअर कट्टा विभागाच्या सहकार्याने जलतारा प्रकल्पा अंतर्गत जलतरा खड्डाचे प्रशिक्षण जलदूत विद्यार्थ्यांना देण्यात आले. जलतारा जनक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न झाली होती.
त्यानुसार विद्यार्थ्यांना जलतारा खड्डा आपल्या गावामध्ये, घरामध्ये, शेतामध्ये घेता यावा. यासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्रत्यक्ष जलतारा खड्ड्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी जलतारा खड्डा कसा असावा. याचे मार्गदर्शन केले. यावेळी आपल्या मार्गदर्शनात त्यांनी "जलतारा खड्डा" घेण्याची प्रक्रिया मृद व जलसंधारणासाठी वापरली जाते. हा खड्डा पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी उपयोगी ठरतो. जिथे पावसाचे पाणी साचते किंवा वाहते असे ठिकाण निवडावे, झाडांजवळ किंवा बागेत केल्यास अधिक फायदेशीर. सामान्यतः 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल खड्डा घ्यावा. गरजेनुसार मोठा खड्डा देखील घेता येतो. सर्वात खाली मोठे दगड (2 फूट), त्यावर मध्यम आकाराचे गोटे (2 फूट), त्यावर गिट्टी/वाळू (2 फूट), सर्वात वर थोडीशी वाळू व माती असावी. वर्षातून एकदा खड्ड्याची साफसफाई करा.गाळ साचल्यास वरचा थर काढून पुन्हा भरावा. यामुळे भूगर्भ जलपातळी वाढवण्यासाठी व पाण्याचा साठा टिकवण्यासाठी उपयुक्त आहे.
पावसाचे पाणी वाया न जाता परिसरातून वाहणारे पाणी खड्ड्यात मुरवल्यास पाणी साठवणूक होते.
विहीर, हँडपंप किंवा बोअरवेल यांची जलपातळी हळूहळू वाढते. झाडांना नैसर्गिकरीत्या पाणी मिळाल्यामुळे गाव/कॉलेज ग्रीन कॅम्पस बनतो. असे प्रतिपादन करताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक गावांमध्ये जनजागृती करावी आणि पाण्याची समस्या सोडवण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी दगडाच तिन्ही स्तर टाकून खड्डा तयार केला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, प्रबंधक राजकुमार सोनवणे, श्री एस एस जगताप, करिअर कट्टा आणि एनसीसीचे विद्यार्थी जलदूत उपस्थित होते.