वाढदिवस साजरा करणारा अवलिया पत्रकार हगलगुंडे; गेली दहा वर्षापासूनचा सातत्यपूर्ण उपक्रम
अणदूर ,दि.११: गुरुनाथ कबाडे
गरीब असो वा श्रीमंत .... लहान असो व मोठा .... कार्यकर्ता असो वा नेता . . . ग्रामपंचायतचा स्वच्छता कामगार असो व संदस्य . . .. कंट्रोलर असो वा चेकर .... रिक्षा प्रवासी असो व रिक्षा ड्रायव्हर .... सेवानिवृत्त असो वा सेवेत ....कर्मचारी असो व कामगार ...पत्रकार असो वा पोलीस ....संपर्कातील असो वा असंबंधित ...हॉटेल मालक असो वेटर ....भेदभाव न करता शाल, फेटा, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ हे सत्काराचे स्वरूप .
गेली दहा वर्षापासूनचा अणदुर येथील पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे यांचा हा सातत्यपूर्ण उपक्रम .चंद्रकांत हागलगुडे यांचे अणदुर ता.तुळजापूर येथील बसस्थानकावर गेली तीस वर्षापासून एक छोटीशी टपरी . पेपर व्यवसाय व पत्रकारिता यापासून सुरू झालेली .
आत्ता फेसबुक आणि व्हाट्सअप मुळे बहुतेकांचे वाढदिवस कळत असल्याने साजरे करणे सोपे झाले आहे . पण यापूर्वी वाढदिवसाच्या तारखा या बहुतांशी माहिती नसायच्या त्यावेळी सुद्धा हगलगुंडे यांच्याकडे जन्म तारखेच्या नोंदी डायरीमध्ये असायच्या . त्यानुसार त्यांना संपर्क करून बोलावून घेऊन यथोचित सन्मान करण्याचा हा त्यांचा छंदच आगळावेगळा .
बसस्थानकाची स्वच्छता करणारा आजीबाळ असो किंवा ग्रामपंचायतचे गटारी स्वच्छ करणारे कामगार यांचाही वाढदिवस साजरा करायला ते विसरत नाहीत . जेवढे जमतील तेवढे बसस्थानकावरील सवंगडी गोळा करून वाढदिवस साजरा करतात . वाढदिवस साजरा झाल्यानंतर काहींनी तर डोळ्यातून अश्रू कडून आजपर्यंत कधी शाल फेटा हार मिळाला नाही , जन्मतारीख माहित नाही , वाढदिवस माहित नाही घरातलं कोणी करत नाही मात्र आपल्यासेपणाने बसस्थानकावर माझा सन्मान होतो याबद्दल हगलगुंडे यांचा आदर ही करतात .
बस स्थानकावरील येणाऱ्या सर्व बसचे चालक व वाहक यांचा त्यांच्याशी दैनंदिन संपर्क असतो तसेच बस स्थानकावर अणदूर आणि नळदुर्गचे जे जवळपास तीस रिक्षा व्यवसायिक आहेत त्यांच्याही जन्म तारखेच्या त्यांच्याकडे नोंदी आहेत . त्यानुसार या सर्वांचा बस थांबवून किंवा रिक्षा थांबवुन यथोचित सन्मान करण्याचा त्यांचा छंद म्हणजे एक व्यसनच .
संपर्कातील एखादया व्यक्तीला वाढदिवस स्वीकारण्यासाठी जरी येता नाही आले तर त्यांना संपर्क करून त्यांना गाठून त्यांचा सत्कार करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत .कधी कधी वाढदिवस स्वीकारणाऱ्याची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे असे वाटले तर त्यांच्याकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम ही हगलगुंडे राबवून घेतात .कोरोना काळात त्यांनी राबवलेला हा वाढदिवस निमित्त सत्काराचा उपक्रम इतका अभिनंदनीय ठरला की नुसता सत्कार नाही तर काही गरिबांना किमान आठवडाभराचा किराणा सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिला .
एक वाढदिवस साजरा करायचा तर किमान दोनशे रुपये खर्च येतो वर्षातून किमान 200 ते 250 वाढदिवस ते आजतागायत साजरा करतात . हा खर्च ते कसा भागवतात याचा विचार न केलेला बरा . पण जेव्हा एखादी व्यक्ती छंद जोपासते त्यावेळी अर्थकारणाचा विषय निर्माण होत नाही .
अशा चंद्रकांत हागलगुंडे या अवलियाचा गुरुवार दि.१२जुन रोजी जन्मदिवस . त्यांच्या हातून आगामी काळामध्ये असेच समाजोपयोगी प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले जावेत याच सदिच्छा .