नळदुर्ग ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेलं एक शहर मात्र.,...,.!
शिवाजी नाईक
नळदुर्ग,दि.२९ जुलै
नळदुर्ग हे शहर आज वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. अपुऱ्या नागरी सुविधा, वाढत्या गुन्हेगारीचा आलेख आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कावर होणारा दुजाभाव, अपूर्ण विकासाचे वास्तव, शहरात विकासाचा वाजतगाजत कोट्यावधी रुपयांचा निधी येतो. मात्र प्रत्यक्षात रस्ते खड्ड्यांनी भरलेले. रस्त्यावरुन ये जा करणा-याना कसरत करणे ही नेहमीचीच बाब होऊन बसली. वाहतुकीचा ताण आणि लाईट सारखी मूलभूत सेवा सुविधा वारंवार खंडित.त्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठ्यात व्यत्यय, हे सर्व नळदुर्गच्या वास्तवाची जळजळीत साक्ष देतात. आज रस्ता बनतो. उद्या तोच पुन्हा खोदला जातो. ही परिस्थिती केवळ नागरिकांचा संयम कसाला लावणारी नाही. तर निधीचा वापर कसा होत आहे. यावर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. रस्त्याच्या मधोमध अस्ता व्यस्त दुचाकी, चारचाकी लावल्याने वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत, सुलभ शौचालयाचा अभाव. सामाजिक अस्वस्थता , या प्रकारचं सातत्य हे सामाजिक असंतुलनाचं आणि मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षितचं चिंताजनक उदाहरण आहे.
त्यातच शहरातील तरुण पिढी नको त्या विळख्यात भरकटत चालल्याची नागरिकांच्या दबक्या आवाजात होणारी चर्चा, या सगळ्यांनी भविष्याला काळोखाच्या कडेला नेऊन ठेवला आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा केवळ नावापुरत्याच? शासकीय रुग्णालय शहरापासून दूर आहे. रुग्णालयामध्ये आपु-या सुविधा , आवश्यक मशनरी अपुरी आहे. शिक्षण संस्थेच्या खेळाचे मैदान ओस पडणं ही चिंतेची बाब आहे.
समाजाच्या वतीने वेळोवेळी सरकारला निवेदन आंदोलन आणि लोकप्रतिनिधी पर्यंत मागण्या पोहोचवण्यात आल्या. मात्र अद्यापही त्यांच्या भावनांना न्याय मिळालेला नाही.
प्रशासनातील निष्क्रियता आणि नागरिकांची तडफड. नेते येतात आश्वासन देतात. फोटो काढून जातात. माध्यमं आवाज उठवतात, पत्रकार प्रश्न विचारतात पण निर्णय घेणाऱ्याच्या मनात काहीच हालत नाही. कारण त्यांना माहित आहे.
नळदुर्गचा माणूस सगळेच गप्पच सहन करतो. मात्र ही शांतता झोपेतली नाही. ही तडफड आहे. आणि तडफड जेव्हा ज्वालामुखी बनते तेव्हा ती व्यवस्थापनालाही हदरवून सोडते. शहराचा विकास केवळ गोडगोड बोलण्याने व कामाच्या देखाव्याचा गाजावाजा केल्याने होत नाही. तो नागरिकांचे प्रश्नांना समजून घेऊन त्यावर उपाययोजना केल्याने होतो. नळदुर्ग सारख्या ऐतिहासिक शहराला केवळ न्याय पारदर्शकता आणि नागरिक सन्मानाची गरज आहे.
नळदुर्गकरांच्या समस्या अनेक आहे. त्या अजूनही सुटल्या नाहीत. नळदुर्ग तालुक्याचे भिजत घोंगडे , महावितरण उपविभागीय कार्यालयाचे रखडत पडलेले काम, ऐतिहासिक किल्ला संगोपन व जतनासाठी भाडेतत्त्वावर देण्यास चालु असलेला वेळकाढूपणा, चार दशकापुर्वीच्या शहरातील आठवडी बाजाराची आज झालेली दुरावस्था,मरणासन आवसयतेतील शासकीय विश्रामगृह, नगरपालिकेचे मुक्त संचार करणाऱ्या जनावरांचा बंद पडलेला कोंडवाडा ,भटकी कुत्रे, डुकरांचा सुळसुळाट , अंडर ग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था अजुनही झाली नाही, जिथे वस्ती नाही, तिथे विकास निधी मोठ्या प्रमाणावर खर्च, स्वच्छतेचे तीन तेरा, ४ दशकापुर्वीच्या महावितरणने विद्युत खांबावर बसविलेल्या वीजवाहक तारा आज जीर्ण होवुन धोकादायक स्थितीत असल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. नळदुर्ग हे पर्यटन स्थळ म्हणून शासनाच्या रेकॉर्डवर नोंदवले गेले. तरी नळदुर्ग खंडोबा आणि रामतीर्थ देवस्थानची तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून अद्याप म्हणावी तशी सुधारणा करण्यात आली नाही. या ठिकाणी पर्यटन निवासस्थान बांधणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे शासनाचे अद्याप लक्ष गेले नाही. रामतीर्थ मंदिराचे तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून जो अर्धवट विकास केला गेला. त्याचे पुढे काय झाले हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे. खंडोबा देवस्थान आज राष्ट्रीय महामार्गावर आले असून या ठिकाणी पर्यटकाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास शहर विकासास मोठ्या प्रमाणात वाव मिळेल. तसेच नळदुर्ग येथे अनेक वर्षापासून बस डेपोची मागणी असुन त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. शहराचा औद्योगिक विकास करण्याकरिता एमआयडीसीला जागा मिळत नाही, कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जागा मिळत नाही, असे एकीकडे सरकारी बाबू सांगत असताना दुसरीकडे मात्र शासनाकडे असलेली जागा कवडीमोल भाडे घेऊन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिली जाते
ही नळदुर्गकरांची शोकांतिकाच आहे. या सर्वांचा विचार केला असता शहराचा विकास होत आहे की अधोगती होत आहे हे विचार करण्याजोगे आहे!