मागासवर्गीय तरुणास मारहाण प्रकरणाचा नळदुर्ग येथे रिपाइं व दलित पँथरच्यावतीने  जाहीर निषेध

 नळदुर्ग,दि.३० :

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गाय चोरल्याचे कारण पुढे करुन एका मागासवर्गीय बौद्ध तरुणास विवस्त्र करून  बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा एक डोळ निकामी झाल्याची निंदनीय घटना घडली असून या  घटनेचा नळदुर्ग  येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व  दलित पँथर  च्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.  या घटनेतील आरोपीना तात्काळ अटक करून त्यांच्यावर  मोक्का कायद्यानुसार कडक कारवाई करावी अशी मागणी नळदुर्ग येथील अप्पर तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 या संदर्भात रिपाइं (आठवले) नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने व दलित पँथरच्या वतीने देण्यात आलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच खामगाव जिल्हा बुलढाणा येथील मागासवर्गीय बौध्द समाजातील २४ वर्षीय तरुण रोहन पैठनकर याला  बसस्थानक परिसरातून अपहरण केले.   तिघांनी बाजुला मैदानात घेवून गेले व गाय चोरीचा अरोप करून त्याला विवस्त्र करून  बेदम मारहाण केली. या मारहाणीत रोहन पैठनकर यांचा एक डोळा निकामी झाला.

  या घटनेतील फरार आरोपीस तात्काळ अटक करून  आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अन्यथा  तिव्र आंदोलन करण्याचा  इशारा  देण्यात आला आहे.
 मंडळ अधिकारी डी.एम. कांबळे यानी निवेदन स्विकारले. निवेदनाची प्रत  नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि नांगरे याना  देण्यात आले आहे. निवेदनावर रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के. गायकवाड,  तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे, राजेंद्र शिंदे,
दलित पँथरचे जिल्ह संपर्क प्रमुख शामकांत नागीले,   रिपाइं अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिद कुरेशी,  सुरेश लोंढे,   दत्ता बनसोडे, देवानंद लोंढे, मारुती लोंढे,  आरविंद लोखंडे,  कैलास गवळी , रावसाहेब वाघमारे आदी कार्यकार्यांच्या सह्या आहेत.
 
Top