गरजूंना शोधून मदत करणारी सेवाभावी संस्था म्हणजे रोटरी - आमदार प्रविण स्वामी                                    
रोटरी क्लब मुरूम सिटीचा पदग्रहण सोहळा थाटात                                                
मुरूम, ता. उमरगा, दि.२७  : 

जागतिक पातळीवर रोटरीने सामाजिक क्षेत्रात आपली सेवाभावीवृत्ती कायम जोपासली आहे. ही सेवाभावीवृत्ती निश्चितच माणसाला प्रेरणा देणारी आहे. समाजातील गरीब, दुर्लक्षित, पीडित गरजूंना शोधून मदत करणारी सेवाभावी संस्था म्हणजे रोटरी होय असे प्रतिपादन आमदार प्रविण स्वामी यांनी केले. 


मुरूम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात रविवारी (ता. २७) रोजी आयोजित रोटरीचा पदग्रहण सोहळ्याप्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. प्रमुख अतिथी उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी, पदग्रहण अधिकारी सहाय्यक प्रांतपाल प्रदिप मुंडे, लातूरचे सहाय्यक प्रांतपाल श्रीराम देशपांडे, रोटरीचे नूतन अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, नूतन सचिव कलाप्पा पाटील, माजी अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनिल राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दीप प्रज्वलन व कुंडीतील रोपट्याला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सौ. अलका नंदकिशोर लोहिया, कोथळीकर यांच्या सौजन्याने पाच गरीब महिलांना शिलाई मशीन, दहा विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाच स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी नूतन सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोटरीची पिन लावून सत्कार करण्यात आला.   नूतन अध्यक्ष सूर्यवंशी यांनी पुढील वर्षभरातील नियोजन व उपक्रमाचा संकल्प करून माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची ओळख करून देऊन त्यांचा  मान्यवरांच्या हस्ते सत्कार घडवून आणला. याप्रसंगी ॲड. उदय वैद्य यांना नोटरी लायसन्स व कुमारी श्रावणी सूर्यवंशी हिचा वाढदिवसानिमित्ताने  मान्यवरांनी सत्कार केला.                                                             
  प्रदिप मुंडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, समाजातील वंचित व दुर्बल घटकांचे हित जोपासण्यासाठी रोटरी क्लब सारखी संस्था जगभर काम करते. ते अत्यंत कौतुकास्पद स्वरूपाचे आहे. त्यांनी रोटरीच्या प्रांतपाल यांचा शुभ संदेश वाचून पुढील नूतन कार्यकारणीला मनःपूर्वक शुभेच्छा  दिल्या.                                                                              
 सहाय्यक प्रांतपाल श्रीराम देशपांडे यांनी रोटरीत काम करताना जो आनंद मिळतो. तो आनंद इतर दुसऱ्या कुठल्याही कामापेक्षा निश्चितच मोठा असतो. रोटरीत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात. जे आयुष्यभर जोपासले जातात. गोविंद पाटील, डॉ. विजयानंद बिराजदार, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश स्वामी, उल्हास घुरघुरे, धनराज मंगरुळे, प्रकाश रोडगे, कल्लय्या स्वामी, आप्पासाहेब पाटील, उदय वैद्य, भूषण पाताळे, मल्लिकार्जुन बदोले, शरणाप्पा धुम्मा, राजेंद्र वाकडे, शिवकुमार स्वामी, बबनराव बनसोडे, अमित पोतदार आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार कल्लप्पा पाटील यांनी मानले. शहर व परिसरातून विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.                                 

फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील रोटरी पदग्रहण सोहळ्याप्रसंगी नूतन अध्यक्ष आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लप्पा पाटील, कमलाकर मोटे, सुनिल राठोड व सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करताना बापूराव पाटील, प्रदिप मुंडे, श्रीराम देशपांडे.
 
Top