मुरुम महसूल मंडळाला अतिवृष्टी अनुदानात वगळल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन; महसूल मंत्र्यांच्या कार्यक्रमाला संतप्त शेतकऱ्यांचा विरोध

मुरुम,दि .७ :

ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरगा व लोहारा तालुक्यांतील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यानंतर शासनाने अतिवृष्टी अनुदान मंजूर केले असले तरी, मुरुम महसूल मंडळ या योजनेतून वगळण्यात आल्याने स्थानिक शेतकरी संतप्त झाले आहेत.

या अन्यायाच्या विरोधात गुरुवारी (ता. ७ ऑगस्ट) रोजी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी बांधवांनी तीव्र आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत, कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून निवेदन स्वीकारेपर्यंत आंदोलन न थांबवण्याचा निर्धार व्यक्त केला.

विशेष म्हणजे, सायंकाळच्या  सुमारास मुरुम शहर परिसरातील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर, कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच असंख्य शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपला संताप आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या वतीने महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुरुम महसूल मंडळात ३३% पेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले होते. तरीही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागाचा अतिवृष्टी अनुदानात समावेश करण्यात आलेला नाही. याअगोदरही असेच अन्यायकारक निर्णय झाले असून, आंदोलना नंतरच मुरुम महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदत मिळाली होती.

यावेळी आंदोलनस्थळी पत्रकार मोहन जाधव, सामाजिक कार्यकर्ते लखन भोंडवे, अजित चौधरी, प्रा. दत्ता इंगळे यांनी आक्रमक मनोगतातुन रोष व्यक्त करत विचारले की, मुरुम महसूल मंडळाच्या चारही बाजूंच्या महसूल मंडळांना अतिवृष्टी नुकसानग्रस्त अनुदानात समाविष्ट केले जाते, मात्र मध्यवर्ती मंडळ असूनही मुरुम महसूल मंडळाला जाणीवपूर्वक का वगळले जाते? शेतकऱ्यांनी शासनाला इशारा दिला आहे की, जर तात्काळ मुरुम महसूल मंडळाचा अतिवृष्टी अनुदान योजनेत समावेश केला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

या आंदोलनादरम्यान बाबा कुरेशी, राहुल वाघ, चंद्रशेखर मुदकन्ना, राजेंद्र शिंदे, संजय सावंत, श्रीधर इंगळे, गणेश कडगंचे, गोविंद सोबाजी, राजेंद्र बेंडकाळे, विशाल व्हनाळे, बाळासाहेब खंडागळे, संजय बेंडकाळे, आनंद भुसाळे, राजू इंगळे, हनुमंत वागदरे, बब्रुवान जाधव, प्रवीण फुगटे, मेहबूब गवंडी, प्रल्हाद माने, विशाल मोहिते, राहुल सत्रे, किशोर शिंदे, गौस मुल्ला, नंदकुमार शिंदे, भालचंद्र बेंडकाळे, संतोष मुदकन्ना, बाळासाहेब गिरिबा यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे नेते, कार्यकर्ते, आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top