या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत हे ऐकून आत्मिक समाधान मिळते

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा वाढदिवस बालाघाट महाविद्यालयात विविध कार्यक्रमाने साजरा

नळदुर्ग ,दि.०४: प्रा.दिपक जगदाळे 

 ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी ही संस्था उभी केली. आज या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत हे पाहून मनाला आत्मिक समाधान मिळते असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

 नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मधुकरराव चव्हाण यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात वृक्षारोपण, वकृतत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रामचंद्र  आलुरे, सहसचिव शहबाज काझी, तेरणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख, राष्ट्रवादीचे गोकुळ  शिंदे, शफी शेख , रोहित पडवळ , प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 उपस्थित पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. सुभाष राठोड अधिक्षक धनंजय पाटील ,नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके, डॉ. उद्धव भाले, डॉ. विजय सावंत डॉ. समीर पाटील,एन.सी. सी.प्रमुख डॉ.आतिश तिडके यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांनी केले. याप्रसंगी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले कि, वयाच्या वीस वर्षापासून मी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालो आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला. याकामी कै.सि. ना.आलुरे गुरुजी,कै.शिवाजीराव बाभळगांवकर व कै.नरेंद्र बोरगांवकर यांची मोलाची साथ लाभली. आम्ही चौघांनी एकत्र येऊन कुसळी गवताचा तालुका ओलीताखाली आणून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास केला . याप्रसंगीअनेकांनी मनोगत व्यक्त करुन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी  तर आभार  धनंजय पाटील यांनी मानले. 
 
Top