आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने नळदुर्ग येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालयास अखेर मंजुरी; भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटून केला आनंदोत्सव 

नळदुर्ग,दि.०१ :

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे नळदुर्ग येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालयास अखेर शासनाने दि.१ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे. त्यामुळे नळदुर्ग शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दुर होणार आहे.या निर्णयाचा भाजपच्या  पदाधिकाऱ्यांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करत व साखर वाटप करुन जल्लोष साजरा केला आहे.


दहा वर्षापूर्वी पासुन  महावितरणचे  नळदुर्गला उपविभागीय कार्यालय व्हावे यासाठी पाठपुरावा सुरु होता. तुळजापूर पंचायत समितीचे तत्कालीन सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे साहेबराव घुगे यांनी सतत पाठपुरावा केला. घुगे यांनी पंचायत समिती सर्वसाधारण सभेत महावितरणचे उपविभागीय कार्यालय नळदुर्ग येथे व्हावे या मागणीचा ठराव मांडला होता.महावितरणच्या आधिका-यांनी ,  तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात शासनास प्रस्ताव दिला. सन 2019 मध्ये सरकार बदलल्याने हा विषय प्रलंबित राहिला होता. त्यानंतर पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हा विषय शासन दरबारी लावुन धरले. अखेर शुक्रवार दि.१ आगस्ट रोजी मंजुरी मिळाली. नळदुर्ग शहर भाजप कार्यालयाबाहेर व बसस्थानक समोरील संविधान चौकात फटाके फोडून अणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपचे नेते सुशांत भूमकर, माजी प.स. सदस्य साहेबराव घुगे, माजी नगरसेवक निरंजन राठोड, भाजपचे शहर उपाध्यक्ष किशोर नळदुर्गकर , उपाध्यक्ष गणेश मोरडे, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, शशिकांत पुदाले, सचिन घोडके,  स्वीय साहाय्यक सुजित जमदाडे, महावितरणचे प्रसन्ना कदम, संदीप गायकवाड, पत्रकार शिवाजी नाईक आदीसह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.


नळदुर्ग महावितरणचे नवीन उपविभागीय कार्यालय निर्मिती 
 
लातूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या धाराशिव मंडळातील तुळजापूर विभागांतर्गत येणाऱ्या तुळजापूर उपविभागाचे विभाजन करून नवनिर्मित नळदुर्ग उपविभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर एकूण १२ पदे आहेत, नवनिर्मित नळदुर्ग उपविभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या 12 पदासाठी  निर्मितीचा खर्च रुपये १,२५,०९,६०४ इतका वार्षिक आर्थिक भार व प्रशासकीय खर्च रुपये १४,८०.०००/-  इतका मंजूर केला आहे. 

नवनिर्मित नळदुर्ग उपविभागीय कार्यालयाकरिता मंजूर पदे

उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, निम्न लिपिक, सहाय्यक लेखापाल, उच्चस्तर लिपिक  सहाय्यक अभियंता, मुख्य तंत्रज्ञ, व  शिपाई असे मिळून बारा पदे मंजूर करण्यात आले आहे.
 
Top