नळदुर्ग बसस्थानकावर आरक्षण व नियंत्रक सेवा सुरू करण्याची शेतकरी संघर्ष समितीने मागणी

धाराशिव,दि.०१:

नळदुर्ग येथील एस.टी. बसस्थानकावर आरक्षण सुविधा व २४ तास वाहतूक नियंत्रकाची सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने राज्याचे परिवहन व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांना स्वीय सहाय्यक दिपक येवेते यांचे मार्फत निवेदन दिले.

नळदुर्ग हे मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५वर वसलेले ऐतिहासिक व महत्त्वाचे शहर असून, सुमारे ६० ते ६५ गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र सध्या बसस्थानकावर आरक्षण सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. तसेच वाहतूक नियंत्रकाची सेवा नसल्यामुळे अनेकदा गोंधळ निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर तातडीने आरक्षण केंद्र आणि २४ तास वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनावर समन्वयक दिलीप गणपतराव जोशी, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकुर, तुळजापूर तालुका अध्यक्ष व्यंकट पाटील आणि तालुका प्रमुख महेश घोडके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top