विकसित भारताचा संकल्प ए. आय. तंत्रज्ञानाच्या जोरावर - चंद्रशेखर बावनकुळे
ऊस शेतीसाठी ए. आय. तंत्रज्ञानाची कार्यशाळा व शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन
मुरुम,दि.०८ :
विकसित भारताचा संकल्प ए. आय. तंत्रज्ञानाच्या जोरावर केला आहे. इथेनॉल व ऊस गाळपासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरायचे आहे. ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत विज पुरवठा करुन दिवसा १२ तास वीज पुरवठयासह घरगुती विजेचे दर कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मुरुम येथिल श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कारखाना परिसरात गुरुवारी दि.७ रोजी ऊस शेतीसाठी ए. आय. तंत्रज्ञानाची कार्यशाळा व शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना महसुमंत्री बावनकुळे हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, संजय कोडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, युवा नेते शरण पाटील, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण, किरण पाटील, मिलिंद पाटील, नितीन काळे, व्यंकटराव गुंड, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, बसवराज कस्तुरे, बलभिम पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते.
पुढे बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, आता भावकीमध्ये शेती विकायची असेल तर ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर तर वाटणीपत्र २०० रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे. शेतकरी, शेतमजूर, उद्योजक यांच्यासाठी मागेल ती मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अभिवचन बावनकुळे यांनी दिले. राज्यातील सर्व शेतरस्ते १२ फुटांचे होणार आहेत. येत्या पाच वर्षांत राज्यातील संपूर्ण शेतरस्ते डांबरीकरण करण्याची हमी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
यावेळी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने सर्वच शेतकऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने लोक वाटा देऊन काम सुरू आहे. ही लोकचळवळ झाली आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देऊन मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करावे, बंद कारखाने सुरु करुन नविन उद्योग मराठवाड्यात आणुन युवकांना रोजगार उपलब्ध करून दयावा व जिल्हा बँकेला मदत करुन गतवैभव मिळवून देण्याची मागणी यावेळी श्री पाटील यांनी केली. यावेळी शरण फाऊंडेशनचे अध्यक्ष शरण पाटील यांनी प्रास्ताविकात शेतकऱ्यांसाठी विठ्ठलसाईच्या माध्यमातून अविरत काम सुरू आहे. उमरगा व लोहारा तालुक्यातील शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शेतरस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असुन शेतरस्त्यासाठी शासनाचा निधी वाढवण्याची मागणी यावेळी केली. या मेळाव्यात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल घडत आहेत. कृषी क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. येत्या काळात बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, पीकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बन प्रमाण शोधणे, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती, तणाचा प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे, तसेच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणे शक्य होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पीकांच्या उत्पादनात वाढ, मजुरी खर्चात बचत, रसायनिक खते व औषधांच्या वापरात कपात, कापणी कार्यक्षमतेत वाढ, रोगनियंत्रणाद्वारे बचत, पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल; असेही महसुलमंञी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.या वेळी पाऊस व राञी ऊशीर झाला असतानाही परिसरातील शेतकरी , शेतमजुर, व्यापारी, कार्यकर्ते,पदाधिकारी यांची ऊपस्थिती होती.