नळदुर्ग शहर कडकडीत बंद ; दोषींवर कारवाई न झाल्यास नळदुर्ग शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा
नळदुर्ग,दि.१२:
सकल हिंदु समाजाच्यावतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या नळदुर्ग शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन येत्या तीन दिवसांत दोषींवर कारवाई न झाल्यास नळदुर्ग शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हजरत पैगंबर जयंती निमित्त रविवारी निघालेल्या मिरवणूकीत औरंगजेबचे उदात्तीकरण करणा-या घोषणासह वादग्रस्त घोषणा देणाऱ्या विरोधात कारवाईसाठी सकल हिंदू समाजाकडून गुरुवार दि.११ सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहर बंद ठेवण्यात आले. पोलीस निरीक्षक सचिन यादव यांना निवेदन देत तीन दिवसात दोषीवर कारवाई नाही झाल्यास पंधरा तारखेपासून नळदुर्ग शहर बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्यास कारणीभूत असणाऱ्या एका धर्मगुरूसह त्याच्या शेकडो समर्थकावर कारवाई करावी, त्यासाठी पोलिसांनी जुलूस दरम्यान केलेली व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली.
तत्पूर्वी अकरा वाजता मल्लिकार्जुन मंदिर ते भवानी चौक असा मुक मोर्चा काढण्यात आला. भवानी चौक येथे कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिसाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.