मुख्यमंत्री साहेब बंजारा समाजाला आरक्षण द्या ?
चिट्ठी लिहून बंजारा समाजाच्या युवकाची आत्महत्या ; नाईकनगर येथील घटना
मुरूम,दि.१३ :
मुख्यमंत्री साहेब बंजारा समाजाला हैद्राबाद गॅजेटप्रमाणे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्या अशा मजकुराची चिठ्ठी लिहून नाईक नगर ता.उमरगा येथील बंजारा समाजाच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे . पवन गोपीचंद चव्हाण वय 32 असे मयताचे नाव आहे.
मयत पवन हा मागील कांही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील जिंतूर येथे गोर समाजाचे अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झाला होता. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती करत होता .शुक्रवारी जिंतूरहुन मूळ गावी नाईकनगरला आला होता.शनिवारी सकाळीच परत जिंतूरला जाणार होता मात्र टोकाचे पाऊल उचलत त्याने सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी मयत पवन याच्या खिशात चिट्ठी आढळली. त्यात वरील नमूद मजकूर लिहला आहे. दरम्यान मयत पवन चव्हाण याच्या पश्चात पत्नी रूपाली, तीन वर्षांचा मुलगा रुद्र, पाच वर्षांची मुलगी रितिका आणि आई द्रोपदाबाई असा परिवार आहे.