मुरूम परिसरातील अतिवृष्टी; शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई  देण्याची मागणी                       


 मुरूम ता.उमरगा दि.२३: डॉ सुधीर पंचगल्ले 


 मागील आठवडाभरापासून संपूर्ण उमरगा-लोहारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली असून विशेषतः बेन्नीतुरा नदीच्या पात्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीपात्राच्या परिसरातील हजारो हेक्टर शेतीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 
मुरूम ते अक्कलकोटकडे जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या अनुषंगाने रविवारी (ता. २१) रोजी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरूम परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच या सर्व परिस्थितीची माहिती धाराशिव जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देत पर्जन्य मापकाची तांत्रिक अट न धरता उमरगा-लोहारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे बाबत विनंती केली. याच दौऱ्या दरम्यान मुरूम शहरातील भीमनगर ते आष्टा कासार रोडवरील शेत शिवार, किसन चौक ते स्मशान भूमीकडे जाणारा नाला, शहरातील ग्रामीण रुग्णालयात ते बाजार रस्ता मध्ये येणारे अनेक दुकानात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने दुकाने, घरे व इतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याची पाहणी करत सदरची संपूर्ण परिस्थितीची माहिती राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषीमंत्री यांना अवगत करून देऊन संपूर्ण धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना दिली. 

यावेळी महसूल मंडळ अधिकारी व्ही. एस. माटे, सहाय्यक कृषी मंडळ अधिकारी जाधव, व्ही. एस. चाकरे, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता संजय मंडगे, मुरूम मुख्याधिकारी सचिन भुजबळ, युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, तलाठी सुदेश होनक्लास, तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, भीमराव वरनाळे, शेखर मुदकन्ना, श्रीकांत मिनीयार, सुरेश मंगरुळे, प्रशांत मुदकन्ना, भगत माळी, दत्ता इंगळे, प्रशांत पाटील, बाबा कुरेशी, अमृत वरनाळे, बाळू खंडागळे, पिंटू फुगटे आदींची उपस्थिती होती.                                                  
फोटो ओळ :  मुरूम, ता. उमरगा येथील अतिवृष्टी झालेल्या शेतशिवाराची पाहणी करताना ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, श्रीकांत मिनियार, कृषी  अधिकारी जाधव, व्ही. एस. चाकरे, संजय मंडगे व अन्य.
 
Top