समाजहितासाठी बंजारा बांधवानी एकत्र येण्याचे श्री संत सेवालाल महाराजांचे वंशज श्री शेखरजी महाराज यांचे नळदुर्ग येथे आवाहन ; आरक्षणाची जुनीच मागणी
नळदुर्ग,दि.०७: शिवाजी नाईक
बंजारा समाजाची आरक्षणाची मागणी गेल्या अनेक दशकांपासूनची जुनी मागणी आहे. तत्कालीन पंतप्रधान, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्रीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे संत श्री रामराव महाराज यांनी आरक्षणाबाबत पाठपुरावा केले होते.
बंजारा समाजातील पुढच्या पिढीच्या भवितव्याकरिता सर्वानी आपले मतभेद बाजूला ठेवून केवळ समाजहितासाठी समस्त बंजारा समाज बांधवानी
एकत्र येण्याचे आवाहन श्री संत सेवालाल महाराजांचे वंशज श्री शेखरजी महाराज यांनी नळदुर्ग येथे समाज बांधवांना मार्गदर्शन करताना केले.
राज्यातील बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेट नुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करण्यात यावा याकरिता बंजारा बांधवाची रविवार दि. ०७ सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहरातील श्री अंबाबाई मंदिर सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री शेखरजी महाराज मार्गदर्शनपर बोलत होते.
देशातील विविध राज्यांमध्ये बंजारा समाजाचे अस्तित्व आहे. सर्वांची बोलीभाषा, पेहराव एकच आहे. परंतु, काही राज्यांत बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट आहे, तर काही ठिकाणी ओबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे. राज्यात व्ही.जे.एन.टी. प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश आहे. राज्यातील समाजाचे अद्याप मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. काबाडकष्ट करणारा समाज असून, ऊसतोड, वीटभट्टी, बांधकाम मजूर म्हणून काम करीत आहे. समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळणे गरज आहे.असेही त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र एक मताने ठराव मंजूर करून ते तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र सरकार यांना एकाच पद्धतीने हैदराबाद गॅझेट व आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व देशातील सर्व राज्याचे संदर्भ देऊन देश पातळीवर सर्व बंजारा समाजास एकाच गटात म्हणजे अनुसूचित जमाती (ST) मध्ये समावेश करण्या बाबत पाठपुरावा करण्याचेही सांगण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक माजी जिप सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केले. अनेकांनी एसटी आरक्षण संदर्भात पुढील दिशा ठरविण्याबाबत मार्गदर्शन व सुचना केल्या. मराठवाड्यातील बंजारा समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी पुढील दिशा ठरविण्यात आली असून या मागणीकरीता 17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना धाराशिव जिल्ह्यातील बंजारा बांधवांच्या वतीने निवेदन देण्याचे बैठकीत एकमताने ठराव मंजूर केले. सरकारने बंजारा समाजास अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी समिती गठीत करून समितीच्या माध्यमातून नोंदी तपासून एसटी प्रवर्गाचा शासन निर्णय पारित करावेत. हैद्राबाद गॅझेट निजाम काळातील महसूल रेकॉर्ड सन 1881 ते 1941 च्या जनगणनेतील ऐतिहासिक नोंदी तपासून अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,यांच्याकडे केली आहे . सरकारने बंजारा बांधवांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बंजारा बांधवांनी यावेळी दिला.
याप्रसंगी निवृत्त नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, ,तांडा समृध्दी योजनेचे सदस्य प्रवीण पवार, तांडा समृध्दी समितीचे सदस्य संतोष चव्हाण, कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण , डॉ.सुरज चव्हाण, कवी गुलाबदास चव्हाण, किरण राठोड,कैलास चव्हाण,रवी महाराज राठोड, माजी नगरसेविका छमाबाई राठोड, अँड राज राठोड, कवी गुलाबदास चव्हाण, दामाजी राठोड , वसंत पवार, सुरेश राठोड, , सुशील राठोड , सचिन जाधव, सचिन राठोड , उपसरपंच अमृता चव्हाण ,माजी सरपंच बालाजी राठोड, राहुल राठोड, सचिन पवार , गोरसेनेचे राजू चव्हाण, कुमार राठोड, संतोष चव्हाण, संजय आडे , दत्ता राठोड, देविदास राठोड, मोतीराम राठोड ,गोविंद राठोड, बकंट राठोड, बालाजी आडे, पत्रकार शिवाजी नाईक, सतिश राठोड आदीसह धाराशिव जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार हरिश जाधव यांनी मानले.