सिंदगाव येथे शंभर गरजू कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करून दीपोत्सव साजरा 

नळदुर्ग,दि.२१:  एस.के.गायकवाड 

 तुळजापूर तालुक्यातील मौजे सिंदगाव येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने गरजू शंभर कुटुंबांना किराणा साहित्य  किटचे वाटप करून दीपोत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला.

 अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकासह जमिनीचे मोठे नुकसान झाले.ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर भूमिहीन शेतमजुरांच्या हाताचे काम बंद झाले. शासनाने आनंदाचा सिधा दिला नाही.त्यामुळे अतिवृष्टीच्या सावटाखाली शेतकऱ्यांना व भूमिहीन शेतमजुरांना दिवाळीचा सण साजरा करण्याची वेळ आली.शेतकऱ्यांना तुटपुंज का असेना शासनाने सरसकट नुकसान भरपाईच्या माध्यमातून आर्थिक मदत केली. परंतु भूमिहीन गोरगरीब शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने, त्या कुटुंबावर मात्र दिवाळीच्या सणावर अतिवृष्टीचे सावट निर्माण झाले.या अतिवृष्टीच्या सावटाखाली दीपावलीचा सण साजरा करणाऱ्या सिंदगाव ता. तुळजापूर येथील १०० गरजू कुटुंबांना, विधवा,परितक्ता, निराधार  एकल महिलांना येथील सामाजिक युवा कार्यकर्ते सतीश ज्ञानोबा शिंदे यांनी दिवाळी किट्सचे वाटप करून त्यांचा दीपावली सण गोड केला.

 येथील धम्मक्रांती बुद्ध विहारात या किटचे वाटप करण्यात आले. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून बुद्ध वंदना घेऊन या किटचे वाटप करण्यात आले.ज्या गरजू  वृद्ध दिव्यांग व्यक्तींना किट वाटपाच्या ठिकाणी येणे शक्य झाले नाही अशा व्यक्तीच्या घरापर्यंत जाऊन त्यांना दिवाळीचे किटचे वाटप करण्यात आले. शासनाने या दिवाळीला आनंदाचा शिधा दिला नाही परंतु येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंदे यांनी मात्र या आनंदाच्या सिद्याची उणिव भरून काढत गोरगरीब सामान्य गरजू कुटुंबाच्या दिवाळीमध्ये आनंद निर्माण केला आणि मोठ्या उत्साहामध्ये त्यांच्या समवेत दीपोत्सव आपल्या मित्र परिवारासह साजरा केला. त्यांचा हा स्तुत्य उपक्रम समाजाला प्रेरणादायी असून सतिश शिंदे यांच्या या स्तूत उपक्रमाचे ग्रामस्थामधून कौतूक केले जात आहे.

 या प्रसंगी भिम शाहीर तथा प्रमाणित लेखापरीक्षक चंद्रकांत शिंदे,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सिद्रामाप्पा परशेट्टी, माजी सरपंच लक्ष्‍मण शिंदे,लाडूशा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे सह सतीश शिंदे  मित्रपरिवार, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top