नळदुर्ग: प्रारूप मतदार यादी अनुषंगाने जवळपास २ हजार ९७९ हरकती ; मतदार यादीबाबत नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया
नळदुर्ग,दि.१९ : शिवाजी नाईक
नगरपालिकेने निवडणूकीच्या प्रारूप यादीच्या अनुषंगाने ८ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांनी हरकती दाखल करण्याबाबत सूचित केल्यानुसार एकंदरीत दोन हजार नागरिकांनी २ हजार ९७९ हरकती दाखल केल्याने मतदार यादीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
नळदुर्ग न.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता एकंदरीत १८ हजार ३४१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रारूप प्रभाग रचना अनुषंगाने एकंदरीत चार हरकती प्राप्त झाल्या होत्या. मात्र प्रारूप मतदार यादी अनुषंगाने जवळपास २ हजार ९७९ हरकती प्राप्त झाल्या आहेत.
दिवसभर नागरिक मतदार यादी वर हरकती नोंदवित होते. हरकतीच्या नोंदी अभिलेख्यावर करून त्याचे प्रभाग निहाय वर्गीकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत वर्गीकरणाचे काम सुरू होते.
एकंदरीत दहा प्रभागातून २० नगरसेवक निवडले जाणार असून त्या करीता एकंदरीत १८ हजार३४१ इतके मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नागरिकांच्या बहुतांश हरकती ह्या रहिवास एका ठिकाणी व मतदार यादीत नाव भलत्याच ठिकाणी अशा स्वरूपाच्या आहेत.
बहुतांश तक्रारी या मुस्लिम बहुलक प्रभाग क्रमांक 6 व 7 या ठिकाणच्या असून सर्वात कमी तक्रारी या प्रभाग 1 व 2 मध्ये आहेत.
मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार
हरकती मोठ्या प्रमाणात असल्या तरी त्यात खूप मोठी तफावत नाही. मतदार संख्या बरोबर आहे. बहुतांश मतदारांना त्यांच्या सोयीनुसारच्या प्रभागात नाव हवे आहे.तक्रारदाराच्या तक्रारी व त्यांचे पत्ते व निवास याची छाननी करूनच आवश्यक तो बदल केला जाईल.असे कुंभार यांनी सांगितले.
आक्षेप घेण्यामध्ये दुबार नोंदणी, मतदार रहात असलेला प्रभाग वेगळा तर यादी मधील नाव दुसऱ्या प्रभागात येणे आदी कारणांमुळे आक्षेप नोंदवले गेले. हक्काचे मतदार दुसऱ्याच प्रभागात गेल्यामुळे अनेक इच्छुकांची मोठी दमछाक होताना अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत दिसून आले. तर नागरिक याप्रकरणी संताप व्यक्त करताना दिसुन आले.
अक्षेप नोंदवल्यानंतर अर्ज 'अ' साठी नगरपालिकेकडून स्थळ पाहणी व निर्णय तर अर्ज 'ब' साठी मात्र नोटीस, चौकशी व उपजिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यासमोर सुनावणी आदी प्रक्रिया राबवून अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. ही सुनावणी जिल्ह्याच्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे.