धाराशिव : खामसवाडी जिल्हा परिषद गटातून मनिषा वाघमारे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत 

 धाराशिव,दि.०३:

   

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. यावेळी सामाजिक कार्यातून प्रेरणा घेणारी आणि जनतेशी घट्ट नाळ जोडलेली तरुण पिढी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहे.

‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या तरुण पिढीला स्थानिक प्रश्नांची अचूक जाण असून विकासाचा आराखडा राबविण्याची ऊर्मी आणि नेटकेपणे काम करण्याची वृत्ती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर खामसवाडी जिल्हा परिषद गटातून मनिषाताई वाघमारे यांचे नाव  मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. समाजकार्यात गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय असलेल्या मनिषाताई यांनी ग्रामीण भागातील असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवून आणल्याचे  सर्वश्रुत आहे.

कोरोनाच्या कालावधीत त्यांनी शेकडो कुटुंबांना मदतीचा हात दिला, औषधे, अन्नधान्य आणि आवश्यक साहित्य घराघरात पोहोचवले. तरुणींसाठी त्यांनी रोजगार निर्मितीचे विविध प्रकल्प सुरू करून शेकडो महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. विशेष म्हणजे, गारमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले.

मनिषा ताईंची सामाजिक प्रश्नांविषयी तळमळ, लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य आणि पक्षाप्रती निष्ठा यामुळे त्या लोकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. नुकत्याच झालेल्या पुरपरिस्थितीत त्यांनी रात्रंदिवस फिरून हजारो कुटुंबांना दिलासा दिला, त्यांना अन्न, वस्त्र, औषधे आणि भावनिक आधार दिला.

त्यांची राजकीय दूरदृष्टी, कार्यनिष्ठा आणि जनसंपर्काची हातोटी पाहता पक्षासाठी मनिषा ताई या आश्वासक चेहरा म्हणून उदयास येत आहेत. निवडणुकीच्या आधीच त्यांच्या नावाची चर्चा जनमानसात रंगत असल्याने, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती ठरत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतून जनतेची सेवा करण्याचा मनिषा ताईंचा संकल्प आणि विकासाभिमुख दृष्टिकोन पाहता, खामसवाडी गटात नव्या नेतृत्वाचा एक मजबूत आणि संवेदनशील पर्याय जनतेसमोर उभा राहत आहे.
 
Top