♦️इच्छुकांची निवडणूक वारी ; नागरिकांची चर्चा लय भारी; पक्षश्रेष्ठी  निष्ठावंताना  तारणार की  डावलणार ? सर्वत्र एकमेव निवडणुकीच्या चर्चेला उधाण♦️

----------------------------------------------------
          विशेष निवडणुक वार्तापत्र २०२५
                  शिवाजी नाईक 
----------------------------------------------------

नळदुर्ग,दि.०४ : 

आगामी  होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका
अत्यंत चुरशीच्या होण्याची शक्यता वाटू लागली आहे. कारणही तसेच आहे. गेल्या महिनाभरापासुन समाज माध्यमवर निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वत्र धुमाकूळ घालत चर्चेचे मोठ्या प्रमाणावर पेव फुटले हे सर्वश्रुत आहे.

  भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी दोन्ही गट,  शिवसेना दोन्ही गट, काँग्रेस आदीसह इतरानी ऐनवेळी निवडणूकीत (बंडखोर) सहभागी झाले तर  बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात  आहे. सध्या मात्र भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे.त्यामुळे  सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यासह कार्यकर्त्यांनी राजकारणात प्रतिष्ठा पनाला लावल्याचे दिसून येत आहे. गावोगावी चुरशीच्या निवडणुका होणार असून आतापासूनच राजकीय वातावरण तापत चालले  आहे.  

निवडणुक जाहिर होण्यापूर्वीच  निवडणुकीची रणधुमाळी  धाराशिव जिल्ह्यात सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर इच्छुकांनी आतापासूनच प्रचाराचा धडाका लावला आहे. इच्छुक उमेदवार मतदारांना नमस्कार घालुन त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेत विचार पुस करीत  आहेत. तर बाहेर गावी असलेल्या मतदारांशी रात्री उशिरापर्यंत संपर्कात भावी पुढारी आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीची चर्चा नळदुर्ग शहरासह ग्रामीण भागात जोरदार होताना दिसत आहे. काही वर्षापासून प्रलंबित  असलेल्या  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची मानली  जाते. राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार हे आता निश्चित झाले आहे. 

नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. सत्ता मिळविण्यासाठी  राजकारणात दिग्गज मानल्या जाणाऱ्यांनी प्रतिष्ठा पनाला लावून आतापासूनच मतदाराच्या भेटीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवित मतदारांना आकर्षित करण्याचे कार्य जोमात सुरू आहे. कार्यक्रमात सहभागी होणा-यामध्ये "राजकारण " या एकमेव विषायावर चर्चा होत आहे. कोणाला उमेदवारी मिळणार ?, कोणाचे तिकीट कट होणार ?, उमेदवारांच्या लढती कशा होणार आणि कोण जिंकणार याविषयी नागरिकात चर्चा रंगत आहे.
--------
🟣नळदुर्ग नगरपालिका🟣

निवडणुकीबाबत शहरातील सार्वजनिक ठिकाणी, गल्ली बोळात नगरसेवक निवडीच्या चर्चा सुरू आहेत. अनेकांना नगरसेवक होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. विविध राजकीय पक्षाचे नेतेमंडळी विजयी होणाऱ्या उमेदवाराच्या शोधात आहेत. त्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. ज्यांच्या मागे मतदाराचा जनाधार आहे अशांना आपल्या पक्षाची उमेदवारी देत निवडणूक  लढविण्याचे विनवणी करू लागल्याची इच्छुक उत्साहने सांगताना दिसत आहे .
यंदाच्या निवडणुकीत  हाँटेल चालक, शिक्षकांच्या पत्नी, बार मालक,  बुकीवाले,  पाणी विक्रेता, सरकारी नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी, पोट गुत्तेदार, इतर व्यवसायिक, सामाजिक क्षेत्रासह गृहणी महिला  निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची खमंग चर्चा नळदुर्ग शहरात रंगली आहे . त्याचबरोबर राजकीय पक्षांनी वयाची ६० ओलांडलेल्यांना  या निवडणुकीत उमेदवारी  देवु नये, प्रथम प्राधान्य युवकांना, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी नागरिकातुन होत आहे.
 
Top