महाविकास आघाडीत खळबळ: राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नगराध्यक्षासह २० जागेवर  निवडणूक स्वबळावर लढविण्याचा इशारा - शहराध्यक्ष महेबुब शेख

नळदुर्ग,दि.१५ : शिवाजी नाईक 

 महाविकास आघाडीत समान वागणूक न मिळाल्यास राष्ट्रवादी शरद पवार गट  नळदुर्ग नगरपालिकेतील दहा प्रभागातील २० जागेवरती आणि एक नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करुन ही निवडणूक स्वबळावर  लढविण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महबूब शेख यांनी शुक्रवार दि.१४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट)  वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

मागील निवडणुकीमध्ये नळदुर्ग नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष राहिलेला असुन १२ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयी झालेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विचार धारेवर, आणि शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग नळदुर्ग शहरामध्ये आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, नळदुर्ग नगरपालिका २०२५ च्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाच्या जागेवर उमेदवार उभे करुन विजयश्री खेचून आणणारा असेही सांगितले.

महाविकास आघाडी करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या तर, मागील निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व जागा आणि एक नगराध्यक्ष पदाची जागा सन्मानाने सुटत असेल तर महाविकास आघाडीचा विचार करण्यात येईल.

पक्षाच्या संघर्षाच्या काळामध्ये पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि तरुणांना संधी देण्याचा मानस पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. त्याच अनुषंगाने शहरातील विकासाचं धोरण असणाऱ्या आणि नळदुर्ग शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने विचार करणाऱ्या, आणि शिव, शाहू, फुले आंबेडकर यांची धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणाऱ्या सुशिक्षित तरुणांना या निवडणुकामध्ये पक्ष संधी देणार आहे.

या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 
नळदुर्ग शहराध्यक्ष महबूब शेख, अँड अमोल पाटील,तुळजापूर तालुका उपाध्यक्ष बशीर शेख,  राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश सचिव ताजुद्दीन शेख, राष्ट्रवादी युवक नळदुर्ग शहराध्यक्ष आनंद उर्फ पिंटू पुदाले, संतोष मुळे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वसीम कुरेशी, इकबाल दाऊद शेख आदीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top