नळदुर्ग शहराचे वातावरण राजकीय चर्चांनी गजबजले आहे. प्रभागनिहाय गणिते, पक्षांतर्गत गटबाजी आणि तिकीट वाटपासाठी सुरु झालेली चढाओढ . यामुळे आगामी काही दिवस एक वेगळीच राजकीय झुंज पाहायला मिळणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करीत आहेत. उमेदवारीचा तिढा कसा सुटणार , बंडखोराना कसे रोखणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर सत्तेचे भवितव्य कोणाच्या हातात जाणार याचा अंदाज बांधणे आजच्या घडीला कोणालाही शक्य नाही. राजकीय समीकरणे आणि प्रभागनिहाय गठबंधनांची उलथापालथ अखेरच्या क्षणी नेहमीप्रमाणेच निर्णायक ठरते.
"युवाशक्तीचा झंझावात"यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे शहरातील बहुतांश नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार हे तरुण आहेत.शिक्षण, सोशल मीडियावरील सक्रीयता, आणि समाजकारणातील अनुभव यांच्या जोरावर हे नवे चेहरे आता थेट जनतेसमोर येत आहेत.परंपरागत नेत्यांच्या सावलीत काम करून कंटाळलेली तरुण पिढी आता स्वतः नेतृत्व करायला तयार आहे.हीच पिढी लोकांशी संवाद साधत, नव्या कल्पनांची भाषा बोलत आणि बदलाचे स्वप्न दाखवत राजकारणाच्या मुख्य प्रवाहात उतरली आहे.
"जनतेचा प्रश्न कायम तेच. प्रश्न नवे नाहीत"
पाणीपुरवठा, तुंबलेल्या गटारी, स्वच्छतेचा अभाव, पथदिवे आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था. प्रत्येक निवडणुकीत हेच मुद्दे चर्चेत येतात, पण निवडणुकीनंतर जनता पुन्हा त्याच समस्यांशी झगडताना दिसते.यावेळी मतदारांचं समीकरण मात्र बदललेलं आहे. लोक आता वचनांवर नव्हे, कामगिरीवर मत देण्याच्या मूडमध्ये आहेत."सत्तेचा खेळ अनिश्चित" राजकीय समीकरणांची गुंतवणूक आणि स्थानिक पातळीवरील वैयक्तिक गटबाजी यामुळे सत्तेचा ताबा कोण घेईल हे भाकीत करणे कठीण आहे. प्रभागनिहाय गठबंधन, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक मतदारांचे प्रमाण, तसेच स्थानिक पदाधिकारी यांची प्रतिष्ठा या सर्व घटकांचा विचार केल्याशिवाय निकालाचा अंदाज बांधणे धोक्याचे ठरते. "यंदाची निवडणूक राजकारणात एक नवीन पर्व ठरू शकते.कारण या वेळी जनतेसमोर फक्त पक्ष नव्हे, तर "नव्या विचारांची आणि जुन्या पद्धतींची" लढत आहे.जर ही तरुण पिढी जनतेचा विश्वास संपादन करू शकली, तर राजकारणात एक नवे युग सुरू होऊ शकते.
नळदुर्ग नगरपालिका निवडणूक म्हणजे केवळ सत्तेची चढाओढ नव्हे, तर एका शहराच्या भवितव्याचा निर्णय घेणारी जनतेची परीक्षा आहे.मतदारांनी पक्षापेक्षा उमेदवाराची पात्रता, त्याचे विचार, आणि त्याची कामगिरी पाहून निर्णय घेतला,तरच ऐतिहासिक नळदुर्ग शहर खऱ्या अर्थाने “स्मार्ट सिटी” कडे वाटचाल करू शकेल.