आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत नळदुर्ग महाविद्यालयातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर मुलांच्या संघाने द्वितीय मिळविले
नळदुर्ग,दि.१४: डॉ. दिपक जगदाळे
आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक १३ व १४ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुलांमुलींच्या खो खो स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ अंकुश कदम यांच्या हस्ते तर अखिल भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ चंद्रजित जाधव , माजी प्राचार्य डॉ मोहन बाबरे , डॉ अशोक कदम, डॉ शिवाजी घोडके, डॉ कपिल सोनटक्के, प्रा. मोतीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड हे होते. महाविद्यालयात झालेल्या या आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत मुलींचे पाच व मुलांचे सहा संघ असे एकूण अकरा संघानी आपला सहभाग नोंदवला होता.
महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेत कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ( मुली ) नळदुर्ग विरुद्ध फिजीकल एज्युकेशन कॉलेज ( मुली ) छत्रपती संभाजीनगर यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत नळदुर्ग महाविद्यालयाच्या संघाने यश संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला तर मुलांच्या गटात जवाहर महाविद्यालय अणदूर व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्यात झालेल्या अंतिम फेरीत अणदूर संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत पंच म्हणून प्रभाकर काळे, नितीन ढोबळे, कृष्णा राठोड, संदिप पुरी, राजाभाऊ शिंदे, डॉ. रफीक शेख यांनी काम पाहिले. सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.