राज्यपातळीवरील नेते प्रचारात उतरल्याने नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीचा आखाडा गाजतेय 


नळदुर्ग, दि.२६ : शिवाजी नाईक 


धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग नगरपालिका निवडणुक मैदान आता  गाजायला सुरवात झाले असुन  राज्यपातळीवरच्या नेते, स्थानिक नेत्यांसह ज्येष्ठ नेतेही आता प्रचाराच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीला चांगलीच रंगत चढत आहे. एका पाठोपाठ एक राजकीय सभांचे आणि स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन झाल्याने नळदुर्ग  नगरपालिका निवडणूक हाय व्होल्टेज होताना दिसत आहे. दरम्यान  निवडणुक रिंगणातील  अपक्ष उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप आज बुधवार दि. २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. 
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार  यांची  शनिवारी रोजी नळदुर्ग शहरात राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली  तर रविवार भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे यांची सभा झाली. त्याचबरोबर एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष, माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची बुधवार दि.२६ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा होत आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यासह , काँग्रेस च्याही सभा  होणार अशी माहिती आहे.


आज होणार चिन्हांचे वाटप


निवडणूक आयोगाने निर्धारित केल्यानुसार दि. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप होणार आहे. राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षांना त्यांचे अधिकृत चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी पोस्टर लावून व ध्वनिक्षेपकद्वारे आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र अपक्ष उमेदवारांना कोणते चिन्ह मिळणार याची निश्चितता नाही. त्यामुळे हे उमेदवार जनसंपर्कावर सध्या भर देत आहेत. पोस्टार आणि पॉम्प्लेटसाठी तयारी झाली असली तरी फक्त चिन्ह टाकायचे तेवढे आता बाकी दिसत आहे. उमेदवाराना चिन्ह मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचाराची गती वाढवणार असली तरी त्यांना मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी फक्त चार दिवस उपलब्ध राहणार आहेत.रविवार  दि.३० नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस राहणार आहे.
  उमेदवार  जोमात निवडणुक प्रचार करत असुन  पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या आघाडीच्या तुलनेत अपक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. दि.२१ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.  नगरध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ८३ उमेदवार रिंगणात आहेत, यात नवखे ६७ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. 


आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता  फक्त चार दिवस मिळणार असल्याने त्यांना मोठी धडपड करावी लागणार आहे. चिन्ह वाटपानंतर निवडणूक प्रचाराला चालना मिळते. अपक्ष उमेदवारांमुळे  दि.२ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण होणार आहे. 
 

 
Top