नळदुर्ग नगरपालिका निवडणुक प्रचाराचा अंतीम टप्प्यात मोठा गलका ; उपमुख्यमंत्री, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री अमित देशमुख यांच्या प्रतिष्ठा पणाला नळदुर्ग , दि.२८: शिवाजी नाईक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे. प्रचाराला तीन दिवस उरले असुन अंतिम टप्प्यात प्रचाराचा मोठा गलका होतो आहे. धाराशिव जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेची चुरशीची समजल्या जाणाऱ्या नळदुर्ग नगराध्यक्ष पदाकडे सर्वांचे लक्ष वेधले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदासाठी बहुरंगी लढत होत आहे. निवडणुक प्रचाराचा एकच गलका उडाला असुन शेवटच्या टप्प्यात मतदारांना भुरळ घालण्यासाठी सर्वांमध्ये चढाओढ लागल्याचे रंजक चित्र नागरिकांना पाहयला मिळत आहे. या होत असलेल्या निवडणुकीत एकूण ८३ पैकी ६७ उमेदवार पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहे. उमेदवार जमेल तसं आपल्या पद्धतीने प्रचारात दंग आहेत. भारतीय जनता पार्टीतर्फे बसवराज आप्पा धरणे,काँग्रेस तर्फे अशोक जगदाळे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून संजय बताले, एमआयएम कडून शहबाज काझी आणि अपक्ष म्हणून ताजोद्दीन शेख हे आपले नशीब अजमावत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवाराच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी रोजी सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलसह दिग्गज नेते गणांची नळदुर्ग शहरात हजेरी लागणार आहे.तर काँग्रेस - शिवसेना उबाठा उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मंत्री अमित देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकरसह अनेक मान्यवर दि.२९ रोजी येणार आहेत.तर अंतीम समयी भाजप निवडणुक जिंकण्याकरिता मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणता फंडा वापरणार याकरिता नागरिकात चर्चा रंगली आहे. शहरातील १० प्रभागासाठी २० नगरसेवक निवडले जाणार असून त्यासाठी येत्या दि. २ डिसेंबरला मतदान होवुन दुसऱ्या दिवशी जि.प. (मुलांची ) प्नशालेत मतमोजणी होवुन निकाल जाहीर होणार आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही बहुरंगी होणार असल्याने चूरस वाढली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गटाकडून) नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवार असलेलं अशोक जगदाळे हे काँग्रेस कडून मैदानात आहेत, भाजपातुन राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले संजय बताले, तर तिकीट न मिळाल्याने काँग्रेसला सोडचिट्टी देऊन एम आय एम मध्ये प्रवेश करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी शहबाज काझी हे मैदानात आहेत.नळदुर्ग शहरात मुस्लिम मतदार असून एमआयएमला साथ देणार का याकडे लक्ष वेधले आहे, राष्ट्रवादी(शरद पवार गट ) कडून नवखे महेबूब शेख आणि अपक्ष म्हणून ताजोद्दीन शेख हे रिंगणात आहेत.नगराध्यक्षपदाचा सामना अत्यंत अटीतटीचा होणार आहे. एकीकडे बोचऱ्या थंडी बरोबर राजकीय हवामात्र गरम होताना दिसत आहे.
अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपलेल्या या अटीतटीच्या लढतीत निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याचा मात्र अंदाज बांधताना नागरिकही गोंधळून जात आहेत. नगरपालिका स्थापनेपासून काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व असून या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेचे तेच ते प्रश्न कायम आहेत. यामध्ये मूलभूत सुविधा, मुबल्लक पाणी पुरवठा, बेरोजगारी,उद्योग धंद्याचा अभाव, नळदुर्ग तालुका प्रश्न असे एक ना अनेक प्रश्नाच्या मुद्द्याचा वर्तुळावर वर्षानुवर्षे प्रचार फिरत आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिन समस्या डोकेदुखी ठरल्याचा तक्रारी कायम असल्याने यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
निवडणूक काळात निव्वळ पोकळ घोषणा देऊन सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम चालू असल्याने मतदार राजा कमालीचा अस्वस्थ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हे निवडणूक केवळ पक्षाच्या नावावर नव्हे तर उमेदवारांच्या कसोटीची ठरणार हे मात्र नाकारता येणार नाही. दि. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार यावकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.