कष्टकरी, गोरगरिबांच्या विकासाठी काँग्रेस उमेदवारास सभागृहात पाठविण्याचे अशोक जगदाळे यांचे आवाहन
नळदुर्ग, दि.२७ :
नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पाणी, वीज, रस्ते, दिवाबत्ती, प्रधानमंत्री आवास योजना राबवुन कष्टकरी, गोरगरिबांच्या विकासाठी काँग्रेस उमेदवारास मत देऊन विजयी करण्याचे नागरिकाना काँग्रेस -शिवसेना उबाठा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी आवाहन केले. शहरातील वसंतनगर - दुर्गानगर प्रभाग क्रमांक १ मध्ये बुधवारी सायंकाळी आयोजित कोपरा बैठकीत अशोक जगदाळे हे उमेदवारांच्या प्रचारावेळी बोलत होते. प्रारंभी ढोल–ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पदयात्रा काढून कॉर्नरसभा घेण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात वसंतनगर येथील श्री संत सेवालाल महाराज व महादेवाच्या दर्शनाने करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी आयोजित कॉर्नर बैठकीत नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी अशोक जगदाळे पुढे म्हणाले की, मागील कार्यकाळाचा उल्लेख करत ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी काही नगरसेवक स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले असुन त्यांना या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवण्याची गरज आहे. काँग्रेसला साथ द्या, म्हणजे विकासाची खरी वाटचाल सुरू होईल. असेही शेवटी ते म्हणाले. या पदयात्रेत उमेदवारासह कमलाकर चव्हाण, संतोष पुदाले, हरीश जाधव, सरदारसिंग ठाकूर, ताजोद्दीन सय्यद सावकार, शाम बगल, संदीप गायकवाड, रुकमोद्दीन शेख, रामजी राठोड, सलीम शेख यांच्यासह प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.