ऐन नळदुर्ग नगरपालिका निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत वसंतनगर प्रभागातील सर्व उमेदवारांना अपात्र ठरविण्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ ; अंतिम निर्णय होईपर्यंत निवडणूक स्थगित करा -राठोड
नळदुर्ग, दि. २० :
सध्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुक प्रचाराची धुमाळी सुरु असुन राजकीय वर्तुळात निवडणुक उमेदवार प्रचारात व्यस्त असतानाच वसंतनगर दुर्गानगर प्रभाग क्र. १ मधील सर्व उमेदवारांना अपात्र घोषित करण्याची मागणी सुर्यकांत राठोड यांनी नगरपालिका निर्वाचन अधिकारी, यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सुर्यकांत राठोड यांनी निवेदनात नमूद केले आहे की, ते प्रभाग क्र. १ मधील रहिवासी असून मागील दहा वर्षांपासून येथील सर्व रहिवाशांची घरे नियमाकुल करण्यासाठी शासनदरबारी लढा देत आहेत. प्रशासन मात्र त्यांना गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारक ठरवत आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमबद्ध करण्याबाबत शासनाने निर्णय घेतले असून त्यानुसार नगरपालिका अनेकदा सर्वेक्षण करून त्याचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहेत.
वसंतनगर सहकारी गृहनिर्माण संस्था ही १९७१ मध्ये नोंदणीकृत असून तिला स्वमालकी हक्क प्राप्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तत्काळीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ११८ धरणग्रस्तांना मान्यता देऊन संस्थेच्या नावे १६ एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे.
यासाठी समजकल्याण कार्यालयामार्फत ९ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले होते, तसेच देखरेखीसाठी उपजिल्हाधिकारी, उपनिबंधक, तहसीलदार व समजकल्याण अधिकारी यांची नियुक्तीही करण्यात आली होती.असे सर्व कायदेशीर दस्तऐवज असतानाही नगरपालिका आजही आम्हाला भोगवटाधारक समजत असून अतिक्रमणधारक ठरवत आहे, अशी खंत राठोड यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रभाग क्र. १ मधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडे स्वमालकीची घरे नसल्याने ते शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारक ठरतात आणि त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणात अंतिम निर्णय होईपर्यंत प्रभाग क्र. १ ची निवडणूक स्थगित करावी, अशी मागणीही राठोड यांनी निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव व तहसीलदार तुळजापूर यांनाही देण्यात आल्या आहेत.
✴️जाहिरात✴️
📍जे.पी.ट्रेडर्स📍
नोट- आमच्याकडे अस्सल गरम मसाला, सुका मेवा, तांदूळ योग्य दरात मिळतील.
पत्ता - इनामदार गल्ली नळदुर्ग
मो. 09850292702
------------------------