नगरसेवक व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षामुळेच वसंतनगरची दुर्दशा ; सोशल मिडियावर संतापाची लाट - सामाजिक कार्यकर्ते दिलीप राठोड
नळदुर्ग,दि.२३:
मागील अनेक वर्षांपासून नळदुर्ग शहरातील वसंतनगर, दुर्गानगर या प्रभाग क्रमांक एककडे निवडुन गेलेल्या प्रतिनिधीसह न.प.प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत मतदार आक्रमक होताना दिसून येत आहे. याबाबत माध्यमांवर दुर्दशा झालेल्या छायाचित्रासह तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप राठोड यांनी बोलताना सांगितले.
या प्रभागात सर्वसाधारण पुरुष गटातून व महिला राखीव गटातून अशा दोन जागेवर चौरंगी लढत होत आहे. या लढतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजप, काँग्रेस या पक्षाच्या उमेदवारात लढत होत आहे. यापूर्वी येथुन नगरपालिकेत निवडून गेलेल्यानी नागरिकांना मूलभूत सोयसुविधा म्हणावी तशी उपलब्ध करून दिले नाही. त्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. एवढेच नव्हे तर निवडणूक पूर्व झालेल्या जनता दरबारात नागरीकांनी आपल्या ढीग भर समस्या अडचणी मांडूनही सुटल्या नसल्याची संतप्त चर्चा नागरिकांत होत आहे. निष्क्रिय ठरल्याबद्दल नवीन नेतृत्व निर्माण होण्यास त्यांचेच हातभार लागले. उलट जुन्या चेहऱ्याला बाजूला सारून नागरीकांनी या निवडणुकीत नव्या चेहऱ्याला पसंदी देत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा ऐकावस मिळत आहे.