अखेर नळदुर्ग नगरपालिकेची निवडणूक  बहुरंगी होणार : ८ विविध राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात दाखल!


नळदुर्ग,दि.१९ : शिवाजी नाईक 


भाजपसह शिवसेना शिंदेगट,  काँग्रेसबरोबर शिवसेना उबाठा, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, एमआयएम, वंचित असे मिळुन   ८ राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवार निवडणुकीत आखाड्यात दाखल झाले आहे. महायुती , महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचे दोन्ही गट पडले  बाहेर तर शिवसेनेचे दोन्ही गट कायम
राहिले आहे.


 नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक आता बहुरंगी होणार असुन महायुती आणि महाविकास आघाडी या निवडणुकीत झालेली नाही. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, एमआयएम व वंचित बहुजन आघाडी हे पक्ष नगरपालिकेची निवडणुक स्वबळावर लढवित आहेत. यावेळी प्रथमच नगरपालिका निवडणुकीत एमआयएम पुर्ण ताकदीनीशी या निवडणुकीत उतरली आहे. कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी अचानक एमआयएममध्ये प्रवेश केल्याने नळदुर्ग शहरात एमआयएम ला मोठी राजकीय ताकद मिळणार अशी चर्चा होत आहे .


नळदुर्ग नगरपालिकेची  ही निवडणुक अतिशय अटीतटीची होणार असल्याचे दिसुन येत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये फाटाफुट झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्रित निवडणुक लढवित आहेत. भाजपने शिवसेना शिंदे गटाला २० पैकी २ जागा दिल्या आहेत. तर काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला एक जागा दिली आहे. 
  महाविकास आघाडीमधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट बाहेर पडला आहे. तर महायुतीमधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट बाहेर पडला आहे. २० जागेसह  नगराध्यक्षपदी निवडणुक लढवित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आता स्वतंत्रपणे निवडणुक लढवित आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट या निवडणुकीत नगराध्यक्षपद आणि १२ जागेवर उमेदवार दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांची संख्या बहुसंख्य राहणार आहे.


नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा एमआयएम पक्ष  या निवडणुकीत उतरला आहे. काँग्रेसचे  माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारल्यानंतर थेट त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश करुन ते एमआयएम कडुन नगराध्यक्षपदाची निवडणुक लढवित आहेत.


  •  शहबाज काझी यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्ष नगरपालिकेची निवडणुकीसाठी ०५ जागेवर उमेदवार दिल्याची माहिती पक्षाचे अझहर शेख यांनी दिली आहे.  या निवडणुकीत एमआयएम पक्ष काय करामत करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटही या निवडणुकीत  उतरला आहे. भाजपमधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केलेले संजय बताले हे नगरध्यक्ष पदाची निवडणुक लढवित आहेत. 
  • नगरपालिका   निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी  नाट्यमय घडामोडी घडल्या. युती आघाडीमध्ये एकमत न झाल्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट बाहेर पडले, तसेच शिवसेनेचे दोन्ही गट युती, आघाडीमध्ये कायम राहिले. 
  • बहुतांश उमेदवारांना भाजपकडून शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थक असलेले माजी नगराध्यक्षांना डावलून माजी नगरसेवकाला नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तर माजी नगराध्यक्षांना प्रभाग १० मधून उमेदवारी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात आला. तर वंचित'कडून तीन उमेदवार मैदानात उतरविण्यात आले आहेत.एकंदरीत यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार याबाबत शंका नाही.


 
Top